गुरुकुल शिक्षणपद्धत आवश्यक का ?

‘एकदा अगस्तीऋषि त्यांच्या शिष्यांसमवेत यात्रेला निघाले. शिष्यांनी मार्गात पुष्कळ काही पाहिले आणि काही प्रश्नही केले. ‘गुरुवर, शहरात मोठमोठे भवन आहेत, फार सुविधा आहेत आणि सुख-भोगाचे मोठमोठे साधन आहेत. असे असूनही बुद्धीमान लोक जंगलातील गुरुकुलांमध्ये त्यांच्या मुलांना का पाठवतात ?’, असा प्रश्न एका शिष्याने केला.

विद्यार्थ्याला सर्वगुणसंपन्न बनविणारी पूर्वीच्या काळची आदर्श गुरुकुल शिक्षणपद्धत

शौर्य आणि आत्मिक बळ यांसह अन्य गुणांचा विकास गुरुकुलात होणे

गुरु अगस्तीऋषि म्हणाले, ‘‘वत्स ! ते बुद्धीमान लोक जाणतात की, घरात भोग-वासनेच्या वातावरणात आपल्या आणि शेजार्‍यांच्या काय कमजोरी आहेत अन् कशी धूर्तता आहे. कोमल चित्ताच्या मुलांवर त्यांचे वाईट संस्कार पडतील. मग पुष्कळ विद्या शिकल्यावरही हृदयात शांती आणि बुद्धीत पवित्रता येणार नाही अन् चित्तात चैतन्याचा प्रकाश होणार नाही. गुरूंकडे चैतन्याचा प्रकाश असतो, बुद्धीत सात्त्विकता असते आणि हृदयात शांती असते.

दशरथ राजा आपल्या सुपुत्रांना महालात ठेवून शिकवू शकत होते, कित्येक डझन शिक्षक ठेवू शकत होते; परंतु त्यांनी आपल्या पुत्रांना गुरु महर्षि वसिष्ठ यांच्याकडे पाठवले. गुरु वसिष्ठ यांनी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना शिक्षणासमवेतच जो ब्रह्मरस दिला, जे ओज दिले, ते महालाच्या विलासी वातावरणात मिळू शकत नाही; म्हणून ते दूरदर्शी लोक आपल्या मुलांना शिकण्यासाठी ब्रह्मवेत्ता ऋषींच्या देखरेखीत ठेवतात. विद्यार्थीदशेत अडचणीतून, संयम-सदाचार आणि साधेपणातून पुढे जात असतांना विद्यार्थ्यांमध्ये सहनशक्ती, अनुमान, क्षमा, शौर्य अन् आत्मिक बळ यांचा विकास होतो; परंतु जे सुख-सुविधांमध्ये गर्क होऊन पदव्या घेतात, ते बिचारे आतून खिळखिळे राहून जातात; म्हणून बुद्धीमान लोक महालांमध्ये आपल्या सुपुत्रांना ठेवत नाहीत.’’

तात्पर्य

जसे शरिरात प्राण (जीव) नाही, तर शरीर व्यर्थ आहे, तसेच आश्रमात आणि मंदिरात संतांचे आगमन किंवा वास्तव्य नाही, सत्संग नाही, तर ती वास्तू केवळ ४ भिंतीचीच आहे. गुरुकुल शिक्षणपद्धत व्यक्तीला विकसित जीवन जगण्याची दृष्टी देते. गुरुकुल परंपरेने शिक्षण झाले, तर हे देशाचे आणि मानवतेचे सद्भाग्य होईल.’

(साभार : मासिक ‘ऋषीप्रसाद’, मे २०२१)