चीनने अरुणाचल प्रदेशमधील ३० ठिकाणांची नावे पालटली !

  • धूर्त चीनची पुन्हा एकदा भारतविरोधी खेळी

  • अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा भाग असून भारताने तो कह्यात घेतल्याचा चीनचा कांगावा !

बीजिंग (चीन) – चीनने अरुणाचल प्रदेशला स्वत:चा भाग असल्याचे सांगत ३० ठिकाणांची नावे पालटली आहेत. चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने ही माहिती दिली. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने दिलेल्या माहितीनुसार यांमध्ये ११ निवासी क्षेत्रे, १२ पर्वत, ४ नद्या, १ तलाव आणि पर्वतांमधून निघणारा १ मार्ग आदींचा समावेश आहे. या ठिकाणांच्या नावांविषयी मात्र कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही नावे चिनी, तिबेटी आणि रोमन भाषांत प्रसिद्ध झाली आहेत.

गेल्या ७ वर्षांत चीनने अरुणाचल प्रदेशमधील ठिकाणांची नावे पालटण्याची ही चौथी वेळ आहे. चीनने एप्रिल २०२३ मध्ये अरुणाचल प्रदेशातील ११ ठिकाणांची नावे पालटली होती. अरुणाचल प्रदेशात चीनचा वाढता हस्तक्षेप पहाता एप्रिल २०२३ मध्ये परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की, यापूर्वीही चीनच्या अशा कृतींचे अहवाल आम्हाला मिळाले आहेत. आम्ही ही नवीन नावे नाकारतो. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अंतर्गत भाग होता, आहे आणि राहील ! अशा प्रकारे नाव पालटून वास्तव पालटणार नाही.

चीनचा असा राहिला आहे दावा !

चीनने अरुणाचल प्रदेशला कधीही भारतीय राज्य म्हणून मान्यता दिली नाही. त्यांनी अरुणाचलचे वर्णन ‘दक्षिण तिबेट’चा भाग म्हणून केले आहे. भारताने तिबेटचा प्रदेश ताब्यात घेऊन त्याचे अरुणाचल प्रदेशात रूपांतर केल्याचा आरोप त्यात करण्यात आला आहे.

चीनचा अरुणाचलवर डोळा असल्याचे हे आहे कारण !

अरुणाचल प्रदेश हे ईशान्येतील सर्वांत मोठे राज्य असून त्याच्या उत्तर आणि वायव्येला तिबेट (चीन), पश्‍चिमेला भूतान अन् पूर्वेला म्यानमार या देशांच्या सीमा आहेत. अरुणाचल प्रदेशला ईशान्येचे सुरक्षा कवच म्हटले जाते. संपूर्ण अरुणाचलवर चीनचा दावा असला, तरी तवांग जिल्ह्यावर त्याचा अधिक दबाव आहे. तवांग अरुणाचलच्या उत्तर-पश्‍चिमेला आहे, जिथे भूतान आणि तिबेट यांची सीमा आहे.

संपादकीय भूमिका

  • आता भारताने संपूर्ण तिबेटवर भारताचा अधिकार असल्याचे सांगून त्याची राजधानी ल्हासा, तसेच शिगात्से, शान्नान, कामडो, ग्यात्न्से आदी प्रमुख शहरांची नावे पालटली पाहिजेत. यासह यारलंग झांग्बो या मुख्य तिबेटी नदीलाही भारतीय नाव देऊन ते घोषित केले पाहिजे ! भारताने एवढ्यावरच न थांबता तैवान आणि हाँगकाँग येथील जनतेलाही स्वत:चे किमान नैतिक समर्थन घोषित करावे !