भक्त भजनांद्वारे डुंबले भक्तीरसात !
फोंडा, ३१ मार्च (वार्ता.) – इंदूरनिवासी थोर संत तथा सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने ३१ मार्च या दिवशी येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘भक्ती सोहळा’ भावपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास प.पू. डॉ. आठवले आणि डॉ. (सौ.) कुंदा जयंत आठवले यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी भजनांच्या गायनाद्वारे भक्तगण भक्तीरसात न्हाऊन निघाले आणि उपस्थित सर्वांसाठी ही मोठी आनंददायी पर्वणीच ठरली. या भक्ती सोहळ्याचा उद्देश प.पू. भक्तराज महाराज यांच्या गोवा येथील भक्त सौ. सुरेखा चिदानंद बोरकर यांनी सांगितला. याप्रसंगी गोवा येथील भजनी मंडळाचे श्री. चिदानंद बोरकर यांच्यासह अनेक भक्त उपस्थित होते. या भक्ती सोहळ्यात भक्तांनी प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांनी रचलेली मराठी अन् हिंदी भाषेतील भजने म्हटली. या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध वास्तूविशारद आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी (जिल्हा पुणे) येथील समाधीस्थानाचे बांधकाम करणारे श्री. भास्कर वागळे यांचा सत्कार सनातन संस्थेचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी, तर सौ. वासंती वागळे यांचा सत्कार सनातनच्या साधिका सौ. देवी कापडिया यांनी केला. या कार्यक्रमानंतर श्री. चिदानंद बोरकर यांचा सत्कार सनातन संस्थेचे पू. पृथ्वीराज हजारे यांनी, तर सौ. सुरेखा बोरकर यांचा सत्कार सनातनच्या साधिका सौ. देवी कापडिया यांनी केला.
प.पू. रामानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त सध्या भारतभरात विविध ठिकाणी वैद्यकीय शिबिरे, अन्नदान, भजन सोहळा आणि पादुका दर्शन सोहळा यांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अंतर्गत १० मार्च २०२४ या दिवशी सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमातही प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा चैतन्यमय वातावरणात पार पडला होता.