आधुनिक वैद्यासह ६ जणांवर पोलिसांत गुन्हा नोंद !

लातूर येथे कामगाराच्या गुप्तांगात मिरची टाकून मारहाण केल्याचे प्रकरण !

प्रतिकात्मक चित्र

लातूर – आनंद कोटंबे (वय ४६ वर्षे) या कामगारास शहरातील किडनीविकारतज्ञ आधुनिक वैद्य प्रमोद घुगे यांनी अन्य सहकार्‍यांच्या संगनमताने फार्म हाऊसवर ३ दिवस डांबून ठेवले. वर्ष २०२१ मध्ये उद्वाहनाच्या (लिफ्टच्या) कामाचा व्यवहार संपलेला असतांनाही ‘तुझ्यामुळे माझ्या १ कोटी रुपयांची हानी झाली आहे’, असा आरोप आधुनिक वैद्य प्रमोद घुगे यांनी केला. या काळात या कामगाराच्या गुप्तांगात मिरची आणि इंजेक्शन देत अमानुष छळ करून मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी आधुनिक वैद्य प्रमोद घुगे, सुनील सिरसाठ, नाना दिघे आणि अन्य ३ अशा ६ जणांच्या विरोधात अपहरण, ॲट्रॉसिटी, जिवे मारण्याचा प्रयत्न आदी कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे.

आधुनिक वैद्य प्रमोद घुगे यांच्या रुग्णालयात उद्वाहन बसवण्याचे काम त्यांनी आनंद कोटंबे यांना ३३ लाख रुपयांना दिले होते. त्यातील १९ लाख रुपये धनादेशाद्वारे कोटंबे यांना दिले. कोटंबे यांनी काम चालू केले; परंतु उद्वाहनाचे काम पूर्ण झालेले असतांनाही आधुनिक वैद्य घुगे यांनी कोटंबे यांचे काम थांबवून ‘मला दुसर्‍याकडून काम करवून घ्यायचे आहे’, असे सांगत उर्वरित रक्कम दिली नाही. कोटंबे यांचे अपहरण करून आधुनिक वैद्य घुगे यांनी स्वतःच्या फार्म हाऊसवर त्यांनी ३ दिवस कोंडून ठेवले, तसेच साथीदारांच्या साहाय्याने मारहाण करून त्यांना लातूर रेल्वेस्थानकावर सोडले. (आधुनिक वैद्य बनून आणि मोठे रुग्णालय उभारूनही वृत्ती तर पालटली नाही; उलट माणुसकीही गमावली. यातून धर्मशिक्षणाची आवश्यकता लक्षात येते. माणुसकीशून्य आणि विकृत असे आधुनिक वैद्य रुग्णांची काळजी काय घेणार ? – संपादक) त्यानंतर नागरिकांनी कोटंबे यांना रुग्णालयात भरती केले.