|
भाग्यनगर (तेलंगाणा) – सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी नोटाबंदीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे. येथील ‘नाल्सर’ या कायदेविषयक विद्यापिठात एका कार्यक्रमाला संबोधित करतांना त्या म्हणाल्या की, नोटाबंदीमुळे काळा पैसा पांढरा झाला, हे खरे; परंतु पुढे आयकराच्या कारवाईचे काय झाले, कुणास ठाऊक ?
सौजन्य News 24
त्या म्हणाल्या की, ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी जेव्हा नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा दैनंदिन आवश्यकतांसाठी नोटा पालटून घ्याव्या लागणार्या कामगारांची काय स्थिती झाली असेल, याची कल्पना करा ! यानंतर ९८ टक्के चलन परत आले, मग काळ्या पैशांचे उच्चाटन कुठे झाले ?
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधिशांच्या खंडपिठाने नोटाबंदीचा निर्णय ‘४ विरुद्ध १’ने वैध ठरवला होता. त्या खंडपिठाच्या सदस्या असलेल्या न्यायमूर्ती नागरत्ना यांनी नोटाबंदीला घटनाबाह्य ठरवले होते.
राज्यपालांनी ‘काय करावे ?’ आणि ‘काय करू नये ?’ हे सांगण्याची पाळी येऊ देऊ नये ! – न्यायमूर्ती नागरत्नाया वेळी राज्ये आणि राज्यपाल यांच्यातील वादावरही न्यायमूर्ती नागरत्ना यांनी चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, अलीकडे एक प्रवृत्ती बनली आहे की, राज्यपालांनी विधेयके मंजूर करतांना किंवा त्यांनी केलेल्या इतर कृतींना वगळणे, हे खटल्याचे सूत्र बनते. ही एक गंभीर घटनात्मक स्थिती आहे आणि राज्यपालांनी घटनेनुसार काम केले पाहिजे जेणेकरून असे खटले अल्प होतील. अलीकडे पंजाब, तेलंगाणा, केरळ आणि तामिळनाडू येथील सरकारांनी बनवलेल्या कायद्यांना तेथील राज्यपालांनी विरोध दर्शवला होता. अशातच केरळ आणि तमिळनाडू येथील राज्य सरकारांनी राज्यपालांवर विधेयके थांबवण्याचा अन् लटकवल्याचा आरोप केला होता. यावर न्यायमूर्ती म्हणाल्या की, राज्यपालांना ‘काय करावे ?’ आणि ‘काय करू नये ?’, हे सांगणे योग्य नाही. मला वाटते आता वेळ आली आहे, जिथे त्यांना राज्यघटनेनुसार कर्तव्य बजावायला सांगितले जाईल ! |