विदारक विवाहबाह्य संबंध !

छत्रपती संभाजीनगर येथे एका घरात ३ लहान मुली असतांना आई-वडील दोघांचेही विवाहबाह्य संबंध चालू होते. एक दिवस दोघेही आई-वडील घर सोडून आपापला प्रियकर आणि प्रेयसी यांच्‍याकडे गेले. अडीच मास आई-वडिलांच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या मुलींचे अश्रू थांबले नाहीत; मात्र निष्‍ठूर आई-वडिलांना पाझर फुटला नाही. घरमालक, समाजसेवक यांनी मुलींचा सांभाळ केला. बाल कल्‍याण समितीला कळल्‍यानंतर त्‍यांनी आई-वडिलांवर गुन्‍हा नोंद केला. हे आहे आजच्‍या समाजव्‍यवस्‍थेचे विदारक चित्र !

विवाहबाह्य संबंधांच्‍या पाश्‍चात्त्यांच्‍या अंधानुकरणातून भारतीय समाजावर मोठे आघात होत आहेत. विवाहबाह्य संबंधांच्‍या संदर्भात अलीकडेच एक अहवाल समोर आला आहे. ‘भारतात अर्ध्‍याहून अधिक लोक त्‍यांच्‍या जोडीदाराची फसवणूक करतात’, अशी माहिती अहवालात समोर आली आहे. आश्‍चर्य म्‍हणजे यामध्‍ये महिलांनी पुरुषांना मागे टाकले आहे. महान अशा हिंदु संस्‍कृतीमुळे भारताकडे आज संपूर्ण विश्‍व आदर्श म्‍हणून पहात आहे, त्‍याच भारतात केवळ कामतृप्‍तीसाठी महिला आणि पुरुष यांनी विवाहबाह्य संबंध ठेवणे, हे लज्‍जास्‍पद आहे. विवाहबाह्य संबंधांचा विचार केला, तर याला कारणीभूत मोठा वाटा हा चित्रपट, मालिका आणि सध्‍या चालू असलेल्‍या वेब सिरीज यांचा आहे. या विकृतीचा सातत्‍याने भडिमार लोकांवर होत असतो. सातत्‍याने पती-पत्नी यांच्‍या पवित्र नात्‍याला खोडा घालून अथवा बगल देऊन ‘तुम्‍ही विवाहबाह्य संबंध कसे टिकवू शकता ?’, याचे अजब चित्रीकरण या मालिकांमध्‍ये असते ! म्‍हणजे ‘विवाहबाह्य संबंधांचे जणू या माध्‍यमातून प्रशिक्षणच देण्‍यात येते’, असे म्‍हटल्‍यास चुकीचे होणार नाही. त्‍यामुळे आता भारतातही लोकांना ‘यामध्‍ये चुकीचे काही आहे’, असे वाटतच नाही. ‘हे चालू शकते’ किंवा ‘त्‍याला पर्यायच नाही’, अशीच मानसिकता आता झाली आहे. हिंदी चित्रपटसृष्‍टी तर सोडाच; पण इंग्रजी चित्रपटसृष्‍टीलाही लाज वाटेल, अशा प्रकारच्‍या ‘वेब सिरीज’ सध्‍या प्रसारित होत आहेत. शैक्षणिक, वैज्ञानिक, सामाजिक, राष्‍ट्रीय अशा विषयांवर नाही, तर केवळ धर्म, जात, अश्‍लीलता, पैसा, गुन्‍हेगारी जगत, विवाहबाह्य संबंध, अमली पदार्थ अशाच गोष्‍टींवर आधारित या मालिका प्रसारित केल्‍या जातात. त्‍यामुळे समाज भरकटला जात आहे. सुसंस्‍कृत समाज पोखरला जात आहे.

विवाहबाह्य संबंध ही विवाह या संकल्‍पनेलाच छेद देणारी आहे. कुटुंबाची आधारशिला असणारी स्‍त्रीच जर अशा प्रकारे वागत असेल, तर ती मुलांवर काय संस्‍कार करणार ? तिची मुले पुढे तसेच वागू शकतात. विवाहबाह्य संबंध आणि अनिर्बंध लैंगिक जीवन यांमुळे काय तोटे होतात, हे पाश्‍चात्त्यांच्‍या लक्षात आल्‍याने ते आता हिंदु संस्‍कृतीकडेच आशेने पहात आहेत. आपण मात्र त्‍यांचे अनुकरण करत आहोत आणि त्‍याची कटू फळे भोगत आहोत !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे