श्री तुळजाभवानी मंदिरातील दागिन्यांच्या अपहार प्रकरणात संबंधितांची ‘नार्को’ चाचणी करावी !

‘श्री तुळजाभवानी पुजारी मंडळा’चे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

(नार्को चाचणीद्वारे आरोपीला काही औषधे देऊन त्याचे मन सुस्त केले जाते. त्यानंतर त्याच्याकडून आवश्यक ती माहिती काढण्याचा प्रयत्न केला जातो.)

श्री तुळजाभवानी

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानी मंदिरातून चोरीला गेलेले देवीचे ऐतिहासिक दागिने, मौल्यवान वस्तू आणि ७१ पुरातन नाणी प्रकरणात अन्वेषण चालू आहे. सदरचे दागिने हे ८ व्या शतकातील आहेत. या दागिन्यांमध्ये देवीचे अतीमौल्यवान रत्नांनी जडीत चांदीचे खडावही आहेत. इतक्या गंभीर प्रकरणाविषयी मंदिराचे आजी आणि माजी विश्‍वस्त यांपैकी कुणीही आवाज उठवण्यास सिद्ध नाहीत. तरी या प्रकरणात तत्कालीन तहसीलदार सतीश राऊत (१० ते १५ वर्षे खासदार शरदचंद्र पवार यांचे स्वीय साहाय्यक), दिलीप देविदासजी नाईकवाडी (कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही, तसेच कारागृहात जाऊन सध्या जामीनावर आहेत) आणि महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजी बुवा (गेल्या ३ महिन्यांपासून पसार) या तिघांची नार्को चाचणी करावी, अशी मागणी ‘श्री तुळजाभवानी पुजारी मंडळा’चे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (जी गोष्ट एका माजी अध्यक्षांच्या लक्षात येते ती गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलीस प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? महंत चिलोजीबुवा गुरु हमरोजी बुवा पसार असणे यातून पोलिसांची अकार्यक्षमता लक्षात येते ! तरी गृहमंत्र्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून पसार आरोपींना अटक होऊन देवीचे दागिने परत कसे मिळतील, यांसाठी संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत, हीच सर्व देवीभक्तांची इच्छा आहे ! – संपादक)

‘सध्याच्या अन्वेषणात पोलिसांना साहाय्य होण्याच्या दृष्टीने वरील तिघांची ‘नार्को’ चाचणी झाल्यास यात नेमके खरे दोषी कोण आहेत ?’, याची उकल होण्यास साहाय्य होईल. या तिघांची नार्को करण्याचा आदेश गृहमंत्र्यांनी तात्काळ द्यावेत आणि देवीभक्तांना न्याय द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.