सध्या ‘रिल्स’ची (काही सेकंदांचे व्हिडिओ) दुनिया आहे. अनेक जण विविध ‘रिल्स’ बनवून ते सामाजिक माध्यमांवर प्रसारित करत असतात. त्यात प्रसिद्धी, पैसा, हौस असे त्यांचे विविध हेतू असतात; परंतु त्यातील काही ‘रिल्स’ इतके वैशिष्ट्यपूर्ण असतात की, मनाचा ठाव घेऊन जातात. अशीच एक ‘रिल्स’ची मालिका नुकतीच पहाण्यात आली. पुण्यातील गगनचुंबी इमारतीच्या छोट्या सज्ज्यात एक ताई प्रतिदिन एका विशिष्ट कावळ्याशी काही संवाद साधते, त्याला खाऊ-पिऊ घालते आणि विशेष म्हणजे तो कावळा त्या ताईला अगदी वैशिष्ट्यपूर्ण प्रतिसाद देतो. हा प्रतिसाद एवढा विशेष आहे, की, पहाणारा अचंबितच होतो. जणू ‘तिचे म्हणणे, तिची भाषा त्याला कळत आहे’, याप्रमाणे तो वागतो. त्या ताईने त्याचे ‘कान्हा’ नामकरण केले आहे. त्याचा मित्रही कधी कधी येतो, त्याचेही नामकरण तिने ‘सुदामा’ केले आहे. ‘अशक्य ते शक्य करतील स्वामी’, या प्रार्थनेच्या गीतावर केलेले त्यांचे एक रिल ‘देवाला काहीही अशक्य नाही’, याचा नकळत संस्कार करते. सकाळचे प्रसन्न वातावरण हे या सर्व ‘रिल्स’चे वैशिष्ट्य आहे. ती ताई जसे म्हणेल, त्याप्रमाणे हा ‘कान्हा’ कृती करतो. एकदा तिने सांगितले, ‘तुला जर भूक असेल, तर त्या भांड्याला चोच लाव, म्हणजे मला कळेल की, तुला भूक आहे.’ असे म्हटल्यावर लगेच ‘कान्हा’ने भांड्याला चोच लावली. एकदा तिने सांगितले, ‘मला तुझे छायाचित्र काढायचे आहे, मान वळव.’ असे म्हटल्यावर त्याने मान वळवली. विशेष म्हणजे काही वेळा हाक मारल्यावरही हे पक्षी सज्ज्यात येतात.
शहरातील धकाधकीच्या जीवनात माणसाचा मोठा अपघात झाला, तरी कुणी लक्ष देत नाही. अगदी शेजारच्या घरात कुणी मृत पावले, तरी माणसे एकमेकांकडे जाणे टाळतात, इतकी ती रुक्ष, स्वार्थी आणि संकुचित झाली आहेत. त्यांना ‘वेळ’ नसतो. अशा वेळी सकाळच्या प्रहरी सज्ज्यात येणार्या कावळ्याशी प्रेमाने बोलून त्याच्याशी इतकी गट्टी करणे, ही जरा ‘हटके’ गोष्ट म्हणावी लागेल. गगनचुंबी काँक्रिटच्या जंगलाने खरी जंगले लुप्त झाली आहेत. त्यामुळे निसर्गालाही ‘आधुनिक’ होण्याविना पर्याय राहिलेला नाही. पक्ष्यांना इमारतीवर घरटी करून रहावे लागत आहे. त्यातही कावळा हा जरा दुर्लक्षित किंवा घृणा निर्माण करणारा पक्षी !; परंतु त्याच्याशी अशी मैत्री करणारा व्हिडिओ पाहिल्यावर वाटते की, अरे प्रत्येक प्राणीमात्राविषयी असे आतून प्रेम असेल, तर आपले जीवन किती आनंदी होईल ! आनंदाची स्पंदने पोचून समोरचाही तसाच आत्मियतेने प्रतिसाद देईल ! आपापसांतील धुसफूस, वैरभाव, द्वेष असे काही उरणारच नाही ! मुके पक्षी जर इतका प्रतिसाद देत असतील, तर भली माणसे नक्कीच देतील; केवळ आपल्याला त्यांच्याविषयी आतून प्रेम वाटायला हवे आणि त्यांच्याशी प्रेमाने बोलायला हवे इतकेच !
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.