व्हॉट्सॲप गटातील राजकीय पोस्ट काढून टाकल्याच्या प्रकरणी पुणे विद्यापिठातील विद्यार्थ्याला मारहाण !

पुणे, २५ मार्च (वार्ता.) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात शिकणार्‍या अनिल फुंदे या विद्यार्थ्याला व्हॉट्सॲप गटात पाठवलेली राजकीय पोस्ट काढून टाकल्याच्या प्रकरणी अनिल फुंदे यांस लाथा-बुक्क्याने आणि आसंदी यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. अनिल फुंदे यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध तक्रार दिली आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर निवडणूक लढवणार असल्याविषयी पोस्ट २१ मार्चला रात्री विद्यापिठातील व्हॉट्सॲप गटात आली. गटाचा मुख्य (ऍडमिन) अनिल फुंदे यांनी गटाच्या नियमावलीनुसार राजकीय पोस्ट काढून टाकली. त्यानंतर २२ मार्चला पोस्ट टाकणार्‍या युवकासह अन्य काही युवकांनी अनिल फुंदे यांस बोलावून शिवीगाळ करत मारहाण केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. मारहाण करणारे युवक युवा सेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याचे अभाविपने म्हटले आहे.

‘गुन्हा नोंद झालेल्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र आंदोलन करून विद्यार्थ्याला न्याय मिळवून देईल’, अशी चेतावणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्री. अनिल ठोंबरे यांनी दिली आहे.