पुण्यातील खडकवासला जलाशयाचे प्रदूषण रोखण्यात १०० टक्के यश !

  •  ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

  •  हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांचा पुढाकार

  •  मानवी साखळीद्वारे प्रबोधन

  • अभियानाचे यंदाचे २२ वे वर्ष

खडकवासला येथे जलाशय रक्षण अभियानाला प्रारंभ करतांना हिंदु जनजागृती समितीचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवर

पुणे –  धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी आयोजित केले जाणारे ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ सलग २२ व्या वर्षीही १०० टक्के यशस्वी झाले. महाराष्ट्राला पाणीटंचाईचे संकट भेडसावत असतांना या मोहिमेला विशेष महत्त्व आहे. हिंदु जनजागृती समिती, खडकवासला ग्रामस्थ आणि समविचारी संघटना यांच्या वतीने हे अभियान २५ मार्च या दिवशी राबवण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी खडकवासला जलाशयाभोवती मानवी साखळी करून नागरिकांचे प्रबोधन केले आणि त्यांना धरणामध्ये उतरू दिले नाही. अभियानासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि हिवरे, सासवड, परिंचे, वाघळवाडी, नसरापूर, शिरवळ, भोर, नवलेवाडी, दौंड, पारगाव, तसेच पिंपरी-चिंचवड येथून आलेले धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

पुणे येथील खडकवासला जलाशय रक्षण अभियानात सहभागी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि समाजातील नागरीक

पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ४ धरणांपैकी खडकवासला या धरणात १.१९ टी.एम्.सी. पाणी साठा आहे. त्यामुळे त्यातून पुण्याची तहान भागवली जाते. धूलिवंदन अथवा रंगपंचमी यांमुळे हे पिण्याचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून ही समाजहितकारी चळवळ २२ वर्षे राबवली जात आहे.  धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे, हिंदु सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवणे, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे, यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रारंभीपासून प्रबोधन करत आहे.

असा झाला अभियानाला प्रारंभ ! 

भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमा पूजनाने अभियानाला प्रारंभ झाला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांनी नारळ वाढवून अभियानाचे उद्घाटन केले. या प्रसंगी हिंदुत्वनिष्ठ श्री. जालिंदर सुतार, उद्योजक श्री. अशोक कडू आणि त्यांचे पुत्र डॉ. विश्‍वेश कडू, बांधकाम व्यवसायिक तसेच शिवणे, उत्तमनगर येथील व्यापारी संघटनेचे श्री. सारंग राडकर, पांडे गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. भानुदास खुटवड, धायरी फाटा येथील विशाल सिंहगड विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानचे श्री. सारंग नवले आणि श्री. विनायक कदम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांसह अन्य मान्यवर आणि १५० हून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

पुणे येथील खडकवासला जलाशय रक्षण अभियानात सहभागी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि समाजातील नागरीक

सर्वत्र पाणीटंचाई असतांना रंग खेळून जलाशय प्रदूषित करणे, हा एकप्रकारे अपराधच  ! – श्री. पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

सध्या सर्वत्र पाणीटंचाई आहे, तसेच पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. अशा वेळी रंग खेळून जलाशय प्रदूषित करणे म्हणजे एक प्रकारे अपराधच आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा होत आहे. धरणातील पाणीसाठा अल्प होत आहे. अशा परिस्थितीत सर्वांनीच जलाशय रक्षणासाठी कार्यरत असले पाहिजे.

३० मार्चच्या अभियानात सहभागी व्हा ! 

प्रबोधनानंतर अनेक नागरिकांनी अभियानाचे विशेष कौतुक केले. पुणे, पिंपरी चिंचवड, भोर, सासवड अशा विविध भागांतून ४० हून अधिक ग्रामस्थ, धर्मप्रेमीही उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी झाले. पोलीस-प्रशासनाचेही या अभियानाला उत्तम सहकार्य लाभले. पाटबंधारे विभागाच्या वतीने धरण परिसरात सूचनात्मक फलक लावण्यात आले होते. अशाच प्रकारे रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे ३० मार्चलाही हे अभियान राबवण्यात येणार आहे. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

वैशिष्ट्यपूर्ण

१. सनातन संस्थेच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांची अभियानाच्या ठिकाणी वंदनीय उपस्थिती लाभली.

२. हिंदु जनजागृती समिती सातत्याने करत असलेल्या प्रबोधनामुळे आणि आणि राबवत असलेल्या मोहिमेमुळे रंग खेळून येणार्‍यांची संख्या अत्यल्प होती.

३. हडपसर येथील सियाराम मंदिर शाखेतील धर्मप्रेमी श्री. आकाश जाधव यांचा काही मासांपूर्वी अपघात झाल्यामुळे चालण्यास अडचण असूनही मित्रांसमवेत ते मोहिमेमध्ये सहभागी झाले.

४. ‘जलदेवतेचे अस्तित्व आणि कृपाशीर्वाद यांमुळेच हे अभियान यशस्वी झाले’, अशी भावना धर्मप्रेमींनी व्यक्त केली.