(म्हणे) ‘त्यागपत्र न देता कारागृहातून सरकार चालवणार !’ – देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल

नवी देहली – १०० कोटी रुपयांच्या देहली मद्य धोरण घोटाळ्याचे ‘मुख्य सूत्रधार’ या आरोपाखाली देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) २१ मार्चच्या सायंकाळी अटक केली. ईडी न्यायालयाने २८ मार्चपर्यंत केजरीवाल यांची ईडी कोठडीत रवानगी केली आहे. अशातच केजरीवाल यांनी, ‘मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र देणार नसून कारागृहातूनच सरकार चालवणार’, असे म्हटले आहे. ‘देहलीच्या जनतेचीही तीच इच्छा आहे’, असे ते या वेळी म्हणाले. केजरीवाल यांना राऊज व्हेन्यू न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते.

ईडीचे अधिकारी कपिल राज आणि सत्यव्रत यांची हेरगिरी करणारा १५० पानांचा अहवाल केजरीवाल यांच्या घरी सापडल्याचा आरोप करण्यात आला होता. हा केवळ शंभर कोटी रुपयांचाच घोटाळा नसून लाच देणार्‍यांनी नफ्यातून ६०० कोटी रुपये कमावल्याचे सांगण्यात आले आहे.

केजरीवाल पुढे म्हणाले की,

१. अनेक अडचणी येतील, याची मला पूर्ण कल्पना आहे. तरीही येथूनच (कारागृहातूनच) काम करण्याचा प्रयत्न करणार आहे.

२. माझी प्रकृती एकदम ठणठणीत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लगेचच इतक्या तातडीने ईडी मला अटक करण्यासाठी घरी येईल, असे वाटलेच नाही.

३. अद्याप कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. अटकेत असतांनाही चौकशी होईल, याची शाश्‍वती नाही; कारण ईडीला चौकशी करायची नाही. ईडीला जे करायचे आहे, ते ती करू शकते.

संपादकीय भूमिका

  • त्याग, पारदर्शकता, निष्कलंकता आणि सत्य यांवर आधारलेली भारतभूमी आहे. पाश्‍चात्त्य देशांतही भ्रष्टाचारासारखे आरोप झाले, तरी राष्ट्रप्रमुख त्यांच्या पदाचे त्यागपत्र देतात. गेल्या नोव्हेंबरमध्ये पोतुर्गालचे पंतप्रधान अ‍ॅन्टॉनियो कॉस्टा यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून पदाचे त्यागपत्र दिले होते. या दृष्टीने केजरीवाल यांची भूमिका त्यांच्यातील नीतीहीनता आणि तत्त्वशून्यता दर्शवते !
  • भारतात अर्थकारणच सत्ताकारण झाले आहे, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे केजरीवाल, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?