मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्राला प्रचंड महसूल, वर्षभरात २१ सहस्र ५५० कोटी जमा !

महसुलासाठी मद्यविक्रीला प्रोत्साहन, नशाबंदीकडे मात्र दुर्लक्ष !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्राला सर्वाधिक महसूल प्राप्त होत आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्राला २१ सहस्र ५५० कोटी रुपये इतका महसूल प्राप्त झाला आहे. मद्याची वाढती विक्री लक्षात घेऊन राज्य सरकारने वर्ष २०२४-२५ साठी मद्यातून महसूल प्राप्त करण्याचे २५ सहस्र २०० कोटी रुपये इतके ठेवले आहे. मद्यविक्रीतून मोठ्या प्रमाणात मिळणार्‍या महसुलामुळे सरकारकडून मद्यविक्रीला प्रोत्साहन देण्यात येत असून दुसरीकडे सरकारच्याच नशाबंदीच्या कार्यक्रमाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

मद्यातून मिळणार्‍या महसुलामध्ये आणखी वाढ व्हावी, यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे सातारा जिल्ह्यातील पाटण येथे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्रही उभारले जाणार आहे. या केंद्रात बेकायदेशीर मद्यविक्री रोखण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, तसेच अधिकृत मद्यविक्रीसाठी प्रयत्न केले जणार आहेत. त्यासाठी नवीन ५१ पदेही सरकारकडून संमत करण्यात आली आहेत. या प्रशिक्षण केंद्रासाठी ३४८ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे.

मद्यविक्री वाढण्यासाठी कोट्यवधी रुपये, नशाबंदीची मात्र बोळवण !

मद्यविक्रीतून मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन या विभागाचे सक्षमीकरण करण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा व्यय केला जात आहे; मात्र दुसरीकडे नशाबंदीसाठी वर्ष २०२३-२४ करता केवळ २० लाख रुपये संमत करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्याच सामाजिक न्याय विभागाकडून अनुदान तत्त्वावर नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य कार्यरत आहे; मात्र या मंडळासाठी घोषित करण्यात आलेला निधीही सरकारकडून वेळेत दिला जात नाही. एक सोपस्कार म्हणून हे मंडळ चालू आहे.

२ वर्षांत बिअरच्या विक्रीत १० टक्क्यांनी वाढ !

मागील २ वर्षांत राज्यातील बिअरची विक्री १० टक्क्यांनी वाढली आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये महाराष्ट्रात बीअरची विक्री २ सहस्र ३२८ लाख लिटर इतकी होती, ती चालू वर्षांत ३ सहस्र २१४ लाख लिटरपर्यंत पोचली आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या विक्रीचे प्रमाण ४ टक्के, तर देशी मद्याच्या विक्रीत ३ टक्के इतकी वाढ झाली आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये १५ मार्चपर्यंत बिअरची विक्री ३ सहस्र २१४ लाख लिटरपर्यंत पोचले आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री २ सहस्र ७३४ लाख लिटर, तर देशी मद्याची विक्री ३ सहस्र ४९८ लाख लिटरपर्यंत पोचली आहे.

संपादकीय भूमिका

  • सरकारने केवळ महसुलासाठी मद्यविक्रीला प्रोत्साहन न देता नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, ही जनतेची अपेक्षा आहे !