महाराष्ट्रात शासनाकडून प्रथमच कीर्तन महोत्सवाचे आयोजन !
मुंबई – लोककला आणि समाज प्रबोधन यांच्या कार्याचा वसा समजल्या जाणार्या कीर्तनाच्या महोत्सवाचे महाराष्ट्र शासनाकडून आयोजन करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात ३ दिवसीय ‘कीर्तन-समाज प्रबोधन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी शासनाकडून २५ लाख रुपये इतके प्रावधान करण्यात आले आहे. समाजातील अनिष्ट प्रथा-परंपरा यांविरुद्ध पुरातन काळापासून संत-महात्म्ये कीर्तन, शाहिरी, भारुडे, लोकगीते यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहेत. या अनुषंगानेच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने २२ मार्च या दिवशी याविषयी शासन आदेश प्रसिद्ध केला आहे.