रस्ते खोदणे आणि बुजवणे ही कामे वेळेत अन् योग्य पद्धतीने करण्याचा पुणे पालिकेचा आदेश !

पुणे – शहरात वेगवेगळ्या भागांत चालू असलेल्या रस्ते खोदण्याच्या कामांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्ते खोदण्याचे आणि बुजवण्याचे काम नियोजित वेळेत अन् योग्य पद्धतीने पूर्ण झाले का ? खोदल्यानंतर काम झाल्यावर रस्ता पूर्ववत् केला आहे का ? याची पहाणी महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून केली जाणार आहे. त्यामध्ये हयगय होत असल्याचे आढळल्यास पथ विभागासह पाणीपुरवठा आणि मलनि:स्सारण विभागाच्या अधिकार्‍यांवरही आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे, तसेच या पार्श्वभूमीवर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी संबंधित कामांचा आढावा घेऊन पथ विभागाला रस्त्यांवरील खोदण्याची कामे अनुमतीनुसार वेळेतच पूर्ण करावीत, अशा सूचना दिल्या आहेत.

खोदण्याची कामे अनुमतीनुसार, तसेच दिलेल्या वेळापत्रकानुसार झाली नाहीत, तसेच खोदल्यानंतर रस्ते व्यवस्थित दुरुस्त केल्याचे पहाणीमध्ये आढळले नाही, तर संबंधित पथ विभागातील कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंत्यावर कारवाई केली जाणार आहे. पथ विभागासहच पाणीपुरवठा आणि मलनिःसारण विभागातील कनिष्ठ अभियंता, उपअभियंते यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

असे आदेश का द्यावे लागतात ? महापालिकेने प्रत्येक स्वतःहून विभागातील कार्यालयीन कामामध्ये हयगय करणार्‍यांवर कारवाई करावी !