‘२.८.२०२३ या दिवशी सकाळी मी छायाचित्रांशी संबंधित सेवा करत होते. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव डॉ. आठवले यांच्या कृपेने छायाचित्रांशी संबंधित ही सेवा करतांना मला मधून-मधून देवदर्शन, तसेच संतदर्शन होत असते. गुरुदेवांच्या या माझ्यावरील कृपेचे भावपूर्ण स्मरण करत मी सेवा चालू केली. ही सेवा करतांना मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि पुणे येथील संत प.पू. कर्वेगुरुजी यांचे छायाचित्र पहाताच भाव जागृत होणे : मी सेवेला आरंभ करतांना या विषयावरील पहिले छायाचित्र उघडले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि पुणे येथील संत प.पू. कर्वेगुरुजी यांचे ते छायाचित्र होते. नकळतच माझे हात जोडले गेले. माझा भाव जागृत झाला. पुढच्या एका छायाचित्रात दोघांनीही प्रार्थनेकरता हात जोडले होते. त्या वेळची त्यांची ती भावपूर्ण स्थिती पाहून माझ्या भावस्थितीत वृद्धी झाली. माझ्या डोळ्यांत अश्रू आले.
२. धूसर दिसणार्या छायाचित्रातून धुपाचा गंध येणे : त्याच स्थितीत पुढची छायाचित्रे पहातांना मला ‘एक छायाचित्र जरासे अस्पष्ट आणि धूसर आहे’, असे वाटले. मी निरखून पहाण्याचा प्रयत्न केला. त्यात प.पू. कर्वेगुरुजींच्या देवघरात उभे राहून सर्वजण प्रार्थना करत होते. देवापुढे नुकताच धूप दाखवलेला दिसत होता. मी ते छायाचित्र काही क्षण न्याहाळले. त्या वेळी मला धुपाचा गंध आला. ‘हा गंध कोठून येत आहे ?’, याचा शोध घेण्यासाठी मी आजूबाजूला पाहिले, तर कुठेच उदबत्ती वगैरे लावलेली दिसत नव्हती. मी पुन्हा त्या छायाचित्राकडे पाहिले. ‘धुपाचा गंध छायाचित्रातूनच येत आहे’, हे लक्षात आल्यावर माझा भाव अधिकच जागृत झाला.
३. कृृतज्ञता आणि प्रार्थना : या सेवेच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेने मला अधून-मधून देवदर्शन, संतदर्शन आणि बसल्या जागेवर तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडते. मला वारंवार भावस्थिती अनुभवता येते. यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘हे श्रीगुरुनाथा, केवळ या सेवेतूनच नव्हे, तर अन्य सेवांमधूनही मला सतत भावस्थिती अनुभवता येऊ दे.’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्रीमती अलका वाघमारे (वय ६५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |