Naxal Area Loksabha Elections : महाराष्ट्रातील ५ नक्षलग्रस्त मतदान केंद्रांमधील मतदान यंत्रे तात्काळ हेलिकॉप्टरने सुरक्षितस्थळी हालवणार !

लोकसभा निवडणुकीच्या घडामोडी !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई, १९ मार्च (वार्ता.) – महाराष्ट्रामधील गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांतील ५ मतदानकेंद्रे नक्षलग्रस्त आहेत. नक्षली कारवाईच्या शक्यतेने या मतदानकेंद्रांतील लोकसभा निवडणुकीचे मतदान दुपारी ३ वाजताच थांबवण्यात येणार असून सुरक्षिततेच्या कारणास्तव मतदान झाल्यावर तेथील मतदान यंत्रे तात्काळ हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षितस्थळी हालवण्यात येणार आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय गृहविभागाकडे ५ हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. गडचिरोली आणि गोंदिया येथे १९ एप्रिल या दिवशी मतदान होणार आहे.

१. गोंदिया जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे अर्जुनी-बोरगाव आणि आमगाव ही २ मतदान केंद्रे नक्षलग्रस्त आहेत, तर गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, आरमोठी आणि गडचिरोली ही सर्वच्या सर्व मतदान केंद्रे नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

२. निवडणूक प्रक्रिया सुरक्षितरित्या व्हावी, यासाठी या नक्षलग्रस्त मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदानाच्या ३ दिवस आधीपासून राज्य आपत्ती सुरक्षा दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यांच्या जवानांचा पहारा ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी अतिरिक्त सुरक्षेसाठी संबंधित जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक आयोग आणि गृह विभाग यांना पत्र पाठवले आहे.

३. वर्ष २००९ मध्ये महाराष्ट्रातील विधानसभा मतदानाच्या ३ दिवस आधी नक्षलवाद्यांनी केलेल्या आक्रमणात १७ पोलीस ठार झाले होते. निवडणुकीच्या कालावधीत करण्यात आलेला महाराष्ट्रातील हे मोठे नक्षली आक्रमण होते. या पार्श्‍वभूमीवर गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

गडचिरोलीत ४ नक्षलवादी ठार !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गडचिरोलीच्या जंगलात मोठा कट रचला जात असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांना मिळाली होती. सी.आर्.पी.एफ्.च्या सी-६० या विशेष कमांडोंसह त्यांनी कारवाई केली. नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत त्यांनी ४ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. बराच काळ ही चकमक चालू होती. नक्षलवाद्यांकडून एके-४७ सह अन्य शस्त्रास्त्रेही जप्त केली आहेत. सुरक्षादलाची कारवाई यापुढेही चालूच रहाणार असल्याचे सांगण्यात आले.

संपादकीय भूमिका 

नक्षलवादाच्या सावटाखाली मतदान होत होणे, ही खेदजनक गोष्ट आहे. नक्षलवाद संपवला, तरच असे प्रकार थांबतील !