Bulgarian Ship Rescue : भारतीय नौदलाने अपहृत नौकेची सुटका केल्याने बल्गेरियाच्या राष्ट्रपतींनी मानले आभार !

बल्गेरियाचे अध्यक्ष रुमेन रादेव व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – भारतीय नौदलाने एडनच्या आखातात बल्गेरियाच्या व्यापारी नौकेची समुद्री दरोडेखोरांपासून (चाच्यांपासून) सुटका केली. यावरून बल्गेरियाचे अध्यक्ष रुमेन रादेव यांनी भारतीय नौदल आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. या नौकेवर बल्गेरियाचे ७ नागरिक कर्मचारी म्हणून काम करत होते. ३ मासांपूर्वी या नौकेचे अपहरण करण्यात आले होते.

भारत समुद्री दरोडेखोर आणि आतंकवादी यांच्याशी लढत राहील ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांनी यावर म्हटले की, आम्ही तुमच्या संदेशाचे कौतुक करतो. मला आनंद आहे की, सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत आणि लवकरच घरी परततील. हिंद महासागरातील चाचे आणि आतंकवादी यांच्याविरुद्ध भारत लढत राहील.

भारतीय सैन्यामुळे नौकेवरील सर्व कर्मचारी सुरक्षित

बल्गेरियाचे परराष्ट्रमंत्री मारिया गॅब्रिएल यांनी भारतीय राजदूत संजय राणा यांची भेट घेतली. या मोहिमेबद्दल त्यांनी भारतीय नौदलाचे आभार मानले. मारिया यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, भारतीय नौदलामुळे नौकेवरील उपस्थित सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. ते लवकरच मायदेशी परततील.

त्यांच्या या पोस्टवर भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी पोस्ट करतांना लिहिले की, मित्र केवळ यासाठी (साहाय्य करण्यासाठीच) असतात.