नवी देहली – निवडणूक आयोगाने १८ मार्च या दिवशी बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांच्यासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि गुजरात या ६ राज्यांच्या गृहसचिवांना हटवण्याचा आदेश जारी केला आहे. बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याखेरीज अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त यांनाही हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांनी १८ मार्चच्या दुपारी झालेल्या बैठकीतील हा निर्णय घोषित केला.
हे सांगण्यात आले कारण !
संबंधित राज्यांमधील काढून टाकण्यात आलेल्या अधिकार्यांकडे संबंधित राज्यांतील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दुहेरी कार्यभार होता. त्यामुळे या अधिकार्यांकडून निवडणूक प्रक्रियेच्या वेळी आवश्यक असलेली निष्पक्षता, कायदा आणि सुव्यवस्था, सुरक्षादलांची तैनाती यांमध्ये तडजोड होऊ शकते, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.