पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर !

पुणे महापालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर

पुणे – महापालिका आयुक्त तसेच प्रशासक विक्रम कुमार यांनी ११ सहस्र ६०१  कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले. भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेतील कार्यकाळात मांडण्यात आलेल्या योजनांची कामे सध्या चालू असून ती पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी प्राधान्य दिले आहे. चालू आर्थिक वर्षात ९ सहस्र ५१५ कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला अपेक्षित होते; मात्र फेब्रुवारी अखेरपर्यंत ६ सहस्र कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. त्यामुळे तीन ते सव्वातीन सहस्र कोटी रुपयांची अंदाजपत्रकीय तूट येत आहे. यंदा मिळकत करामध्ये वाढ केली नसली, तरी पुढील वर्षभरात मिळकत करातून

२ सहस्र ५४९ कोटी ७९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे स्पष्ट केले आहे. उत्पन्न वाढीसाठी थकबाकी वसुलीला महापालिकेने प्राधान्य दिले आहे, तसेच २ सहस्र कोटींहून अधिक निधी शासकीय अनुदान स्वरूपात मिळेल, असा आशावादही व्यक्त केला आहे. शहरात सध्या चालू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी लागणार असून खर्चही अधिक होणार आहे. त्यातच उत्पन्नासाठी शासकीय अनुदानावर अवलंबून राहिल्याने खर्च आणि जमा बाजूचा ताळमेळ घालण्यासाठी महापालिकेला कसरत करावी लागेल. पुढील वर्षी महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता असल्याने अंदाजपत्रकाच्या कार्यवाहीला आचारसंहितेचा फटका बसेल. सातवा वेतन आयोग, कर्मचारी भरती, त्यांचे वेतन, देखभाल दुरुस्ती, सेवक वर्ग यांवरही महापालिकेला मोठा खर्च करावा लागणार आहे.