पुणे महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीमध्ये ३०० कोटी रुपयांचे प्रस्ताव संमत !

१७५ हून अधिक कामांना मान्यता !

पुणे महापालिका

पुणे – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी २ टप्प्यांमध्ये झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ३०० कोटी रुपयांच्या कामांचे १७५ पेक्षा अधिक प्रस्ताव संमत करण्यात आले. पाणीपुरवठा, वाहतूक, प्रकल्प विभाग अशा सर्व विभागांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे या कामांचा लवकरच प्रारंभ होईल.

महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी अंदाजपत्रक सादर करतांना वेगवेगळ्या कामांसाठी आर्थिक तरतूद केली होती. या कामांच्या निविदा चालू आर्थिक वर्षांमध्ये प्रसिद्ध करणे आवश्यक होते. त्यामुळे त्या निविदा काढण्यासाठी प्रशासनाची लगबग चालू होती. २ दिवसांपूर्वी अनेक कोटी रुपयांच्या निविदा संमतीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. १५ मार्च या दिवशी पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपयांचे १०० हून अधिक, तर संध्याकाळी दुसर्‍या टप्प्यात उर्वरित प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. या प्रस्तावांमध्ये उड्डाण पूल बांधणे, तलावातील जलपर्णी काढणे, रस्त्यांचे डांबरीकरण, जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे.