साधकांनो, मनमोकळेपणाने बोलण्यासाठी प्रयत्न करून साधनेतील आनंद मिळवा !

१. मनमोकळेपणाने बोलता येण्यासाठी करायचे प्रयत्न

सौ. वर्धिनी गोरल

‘एखाद्या साधकाला मोकळेपणाने बोलायचे असते; परंतु ‘आरंभ कुठून करायचा ?’, हे त्याच्या लक्षात येत नाही.

१ अ. साधकांनी आपापल्या प्रकृतीनुसार मनमोकळेपणाने बोलण्यासाठी करायचे प्रयत्न 

१ अ १. मितभाषी : साधकांशी सहजतेने येता-जाता बोलावे. ‘जेवलात का ? कसे आहात ? काय करत आहात ?’, असे बोलून सहजतेने कधी हात लावून, तर कधी हसून त्यांची विचारपूस करावी. प्रतिदिन एका साधकाशी बोलण्यास प्रारंभ करावा.

१ अ २. स्वकोषात रहाणारे : स्वतःच्या कोषात रहाणार्‍या साधकाने त्याविषयीचे मनातील विचार लिहून काढावेत. ते विचार उत्तरदायी साधकांना सांगावेत आणि त्यावर वस्तूनिष्ठ उपाययोजना काढावी.

१ आ. कुटुंबियांची प्रकृती समजून घेऊन त्यांच्याशी वागा ! : आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते. घरातील एक व्यक्ती चिडचिड करत असेल आणि दुसरी शांत प्रकृतीची असेल, तर आपल्याला या दोन्ही प्रकृतींशी जुळवून घेता येत नाही. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीची चिडचिड होते, त्या वेळी ‘तिची ही स्थिती कशामुळे होत आहे ?’, हे समजून घेऊन त्याविषयी तिच्याशी बोलावे. त्यावर उपाययोजना काढावी किंवा त्या व्यक्तीकडून नामजपादी उपाय करून घेणे शक्य असल्यास तसे प्रयत्न करून घ्यावेत. त्यामुळे त्या व्यक्तीची चिडचिड न्यून होण्यास साहाय्य होईल. एखादी व्यक्ती शांत असेल आणि आपल्याला पटकन प्रतिसाद देत नसेल, तर ‘तिने काहीतरी प्रतिसाद द्यावा’, अशी आपली अपेक्षा असते. त्या वेळी आपण तिची प्रकृती समजून घ्यायला हवी.

१ इ. सर्व वयोगटांतील साधकांशी बोलून त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा ! : तरुण साधकांना वाटते, ‘वयस्करांशी काय बोलावे ? त्यांना नीट ऐकू येत नसल्याने त्यांच्याशी मोठ्याने बोलावे लागते’; पण आपण शिकण्याच्या स्थितीत असले पाहिजे; कारण वयस्कर साधकांकडे आपल्यापेक्षा अधिक अनुभव असतो. तरुण साधक त्यांच्याशी बोलून त्यांच्या अनुभवाचा लाभ करून घेऊ शकतात. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या साधकांमध्ये लहान होऊन वागल्यास साधकांना आनंद मिळू शकतो. त्यामुळे बोलतांना वयाच्या मर्यादेची अडचण दूर होईल.

१ ई. साधकामधील गुण पहा आणि एखाद्या साधकाचा स्वभावदोष लक्षात आल्यास उत्तरदायी साधकांशी बोलून त्याला साधनेत साहाय्य करा ! : एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडत असल्यास आपल्याला तिच्याशी बोलता येते. दुसर्‍या व्यक्तीचा स्वभाव आवडत नसल्यास आपण तिच्याशी बोलणे टाळतो. अशा वेळी आपण ‘प्रत्येक जीव देवाचा असून प्रत्येकामध्ये गुण-दोष असतातच’, असा विचार करावा. आपण सकारात्मक राहून साधकांमधील गुण पाहिले पाहिजेत. साधकांमधील स्वभावदोष लक्षात येत असतील, तर आपण उत्तरदायी साधकांशी बोलून त्यांना त्यांच्या साधनेत साहाय्य करू शकतो.

१ उ. स्वतःच्या अडचणी मनमोकळेपणाने मांडा ! : काही कारणाने आपण आपली अडचण आणि मनातील विचार उत्तरदायी साधकाला सांगू शकत नाही. अशा वेळी जे साधक आपल्या जवळचे वाटतात, त्यांच्याशी आपण बोलू शकतो. त्यांना आपल्या अडचणी सांगून उपाययोजना विचारू शकतो किंवा संतांशी बोलू शकतो.

२. मनमोकळेपणाने बोलल्याने होणारे लाभ !

२ अ. मन निर्मळ होऊन आनंदी रहाता येणे : मनमोकळेपणाने बोलण्याला साधनेत पुष्कळ महत्त्व आहे. मनमोकळेपणाने बोलल्यामुळे आपले मन निर्मळ होण्यास साहाय्य झाल्याने आपण आनंदी होतो आणि आपल्याला मिळणारा आनंद दुसर्‍यालाही देता येतो. मन आनंदी असल्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.

२ आ. मनमोकळेपणाने बोलण्यास प्रारंभ केल्यावर स्वतःतील स्वभावदोष लक्षात येऊन ते दूर करण्यासाठी प्रयत्न करता येणे : ‘भीती वाटणे, प्रतिमा जपणे, स्वतःला न्यून लेखणे, पूर्वग्रहदूषितपणा, अनावश्यक विचार करणे’, या स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंमुळे आपण इतरांशी बोलणे टाळतो. आपण कुणाशी तरी मनमोकळेपणाने बोलण्यास प्रारंभ करायला पाहिजे. आरंभी समोरच्या व्यक्तीशी बोलणे थोडे कठीण वाटेल; परंतु एकदा बोलण्याची सवय झाल्यावर ‘बोलतांना आपल्यातील कोणते स्वभावदोष उफाळून येतात ?’, हे आपल्या लक्षात येऊ लागेल. त्यामुळे ते दूर करण्यासाठी प्रयत्न करणे सोपे जाईल.

२ इ. साधकांविषयी पूर्वग्रह ठेवण्याऐवजी वर्तमानस्थितीत राहून त्याच्याशी बोलल्यास दुरावा दूर होऊन त्या साधकाशी जवळीक निर्माण होणे : पूर्वी आपले काही साधकांच्या समवेत प्रसंग घडलेले असल्यामुळे त्याचा आपल्या मनावर परिणाम झालेला असतो. त्यामुळे आपण त्या साधकांशी बोलणे टाळतो. पूर्वग्रहात न अडकता वर्तमान स्थितीत राहून आपण त्याच्याशी बोललो, तर आपल्यातील दुरावा दूर होऊन आपली त्या साधकाशी जवळीक निर्माण होईल.

२ ई. साधकांशी प्रेमाने बोलल्यास त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण होणे आणि त्यांना आधार वाटणे : काही वेळा साधकांना सेवा किंवा अन्य कारणे यांमुळे बोलायला वेळ नसतो. त्यामुळे बरेच जण इतरांशी बोलणे सोडून देतात. ‘बोलण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागतो’, असे नाही. आपण सहजतेने बोलू शकतो. त्यामुळे साधकांमध्ये जवळीक आणि आपुलकी निर्माण होते, तसेच त्या साधकाला आपला आधार वाटतो. काही गोष्टी तारतम्याने पाहून आपण ‘काय बोलायचे ?’, ते ठरवू शकतो. आश्रमातील संत येता-जाता समोर आलेल्या साधकांशी दोन शब्द बोलून त्यांना आनंद देतात. त्यांच्याकडून पुष्कळ शिकण्यासारखे आहे.

२ उ. संत आणि साधक यांच्या सत्संगामुळे भीतीदायक प्रसंगातून बाहेर पडता येणे : ‘व्यावहारिक जीवनात घडलेल्या प्रसंगात अपघात, घरातील व्यक्तीचे निधन आणि पाहिलेले भयानक दृश्य’, अशा प्रसंगांमुळे मनावर ताण येऊन आपल्याला भीती वाटते. अशा वेळी त्यातून बाहेर पडण्यासाठी ‘संत आणि साधक यांच्या सत्संगात रहाणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करणे किंवा प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकणे’, असे प्रयत्न करू शकतो. त्यामुळे वर्तमानकाळात रहाता येऊन मनावरील ताण दूर होईल आणि आनंद मिळेल.

२ ऊ. मनमोकळेपणाने बोलल्यास ‘बहिर्मुखता, एकलकोंडेपणा, पूर्वग्रहदूषितपणा आणि न्यूनगंड’, हे स्वभावदोष न्यून होण्यास साहाय्य होते.

२ ए. सहसाधकाला त्याची चूक मनमोकळेपणाने सांगून साहाय्य केल्यास समष्टीवर होणारा परिणाम टाळता येणे : ‘एखादा साधक त्याच्या सेवेच्या पहिल्याच टप्प्याला काहीतरी चुकत आहे’, हे आपल्या लक्षात येते; पण ‘त्याला काय वाटेल ?’, या विचाराने आपण त्याला त्याची चूक सांगायचे टाळतो. त्यामध्ये आपली हानी होतेच; पण स्वतःची चूक लक्षात न आल्यामुळे त्या साधकाचीही सेवा परिपूर्ण होत नाही. त्याचा परिणाम त्याच्या सेवेवर होतो. ती सेवा पुन्हा करण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागतो. आपण त्याला सेवेत साहाय्य करणार असल्यामुळे आपलीही सेवा प्रलंबित राहून आपला वेळ वाया जातो.

३. मनमोकळेपणाने बोलण्यासाठी प्रयत्न करणार्‍या साधकांना अन्य साधकांनी साहाय्य कसे करावे ?

आपल्या समवेत जे न बोलणारे साधक असतात, त्यांचे निरीक्षण करून ‘त्यांच्या मनावरील ताण जाईल’, अशा पद्धतीने त्यांच्याशी प्रेमाने बोलावे. त्यामुळे त्यांना सहजतेने बोलता येऊ लागेल.’

– सौ. वर्धिनी वासुदेव गोरल (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय २७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.९.२०२३)