मद्यालये-बार यांना देवतांची नावे न देण्याचा शासनाचा निर्णय केवळ कागदावर !

२ वर्षांनंतरही कार्यवाही नाही !

मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – राज्य सरकारच्या गृह विभागाने ७ एप्रिल २०२२ या दिवशी  ‘मद्यविक्री करणार्‍या आस्थापनांना देवता, राष्ट्रपुरुष, महनीय व्यक्ती आणि गड-दुर्ग यांची नावे देण्यात येऊ नयेत आणि अशा प्रकारची नावे असलेल्या मद्यालयांनी नावात पालट करावा’, यासाठी आदेश काढण्यात आला होता; मात्र ‘देवता’ म्हणून कोणती नावे ग्राह्य धरावीत ?’ हे आदेशात सुस्पष्ट दिलेले नाही. त्यामुळे गृह विभागालाही यावर कारवाई करणे शक्य झालेले नाही; कारण एखाद्या बारमालकाने देवतेचे नाव दिले, तरी तो ‘ते संबंधित नात्यातील व्यक्तीचे आहे’, असे म्हणू शकतो. त्यामुळे २ वर्षांपूर्वी काढलेला हा शासन आदेश केवळ सोपस्कार ठरला आहे.

१. शासनाच्या या आदेशामध्ये ‘कोणत्या राष्ट्रपुरुषांची कोणती नावे ग्राह्य धरावीत ?’ हे कळावे, यासाठी ५६ नावे देण्यात आली आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, महाराणा प्रताप आदींसह विद्यमान पंतप्रधान आणि विद्यमान राष्ट्रपती यांच्या नावांचाही समावेश आहे.

२. गड-दुर्ग यांचीही १०५ नावे या आदेशात देण्यात आली आहेत. त्यामुळे बार, मद्यालये, परमिट रूम यांना कोणते राष्ट्रपुरुष आणि गड-दुर्ग यांची नावे देण्यात येऊ नयेत, याची स्पष्टता आली आहे. याउलट देवतांची नावेच नसल्यामुळे ‘देवतांची कोणती नावे ग्राह्य धरावीत ?’ हे स्पष्ट होत नाही.

३.  सद्यःस्थितीत राज्यात ‘लक्ष्मी बीअरबार’, ‘साई बीअरबार’ या नावाने मद्यालये कार्यरत आहेत. केवळ आदेशात स्पष्टता नसल्यामुळे मद्यालयांना असलेल्या देवतांच्या नावामध्ये अद्यापही पालट करण्यात आलेले नाहीत.