सांगली येथील अनधिकृत पशूवधगृह महापालिकेने तात्काळ बंद करावे !

 ‘धर्मवीर संभाजी महाराज गोरक्षक सेने’ची घंटानाद आंदोलनाद्वारे मागणी !

घंटानाद आंदोलनच्या वेळेस उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

सांगली, १६ मार्च (वार्ता.) – येथील गणेशनगर परिसरात अनधिकृतपणे चालू असलेले पशूवधगृह बंद करण्याविषयी अनेक वेळा तक्रारी करूनही ते आजही चालूच आहे. महापालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही येथे गोवंश हत्या, तसेच अनेक जनावरांच्या कत्तली केल्या जात आहेत. त्यामुळे प्रचंड प्रदूषण होत असून येथील सर्वच नागरिकांच्या जीविताला हानी पोचत आहे. असे असूनही महापालिका प्रशासन संबंधितांवर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने हे पशूवधगृह त्वरित बंद करावे या प्रमुख मागणीसाठी १५ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजता येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘धर्मवीर संभाजी महाराज गोरक्षक सेने’च्या वतीने ‘घंटानाद आंदोलन’ करण्यात आले.

१. या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार श्री. नितीन शिंदे म्हणाले की, राज्यात गोहत्या बंदी कायदा असूनही अनधिकृतपणे चालू असलेल्या या पशूवधगृहावर महापालिकेने बुलडोझर फिरवावा.

२. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विनायकराव येडके यांनी, ‘१५ दिवसांच्या आत या पशूवधगृहावर कारवाई करावी आणि याचसमवेत सर्व गोरक्षकांना पोलीस संरक्षण आणि विमा संरक्षण देण्यात यावे’, अशी मागणी केली.

३. धर्मवीर संभाजी महाराज गोरक्षक सेनेचे सचिव श्री. धर्मेंद्र कोळी म्हणाले, ‘प्रशासनाने हे पशूवधगृह न हटवल्यास गोरक्षक सेना स्वतःहून भुईसपाट करेल.’

४. ‘मातंग समाजाची दिशाभूल करून वारंवार गोहत्या करणारे अनिल ऐवळे आणि त्यांचे सहकारी यांच्यावर ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी गोरक्षक सेनेचे श्री. अभिमन्यू भोसले यांनी केली.

५. ‘गणेशनगर येथील अनधिकृत पशूवधगृह बंद करण्याच्या या मागणीला शिवसेना १०० टक्के पाठिंबा देत आहे’, असे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उमाकांत कार्वेकर यांनी या वेळी घोषित केले. शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख राणीताई कमलाकर यांनीही या सर्व मागणीस १०० टक्के पाठिंबा दिला आहे, तसेच गोरक्षक सेनेसह रस्त्यावर उतरण्याची चेतावणीही त्यांनी दिली.

६. गोरक्षक श्री. नीतेश ओझा यांनी गणेशनगर परिसरात अनेक घरांमध्येही अनधिकृत जनावरांच्या कत्तली केल्या जात असून या सर्वांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

७. या आंदोलनाच्या वेळी उपस्थित मान्यवरांसह हिंदु एकता आंदोलन सांगलीवाडीचे अध्यक्ष श्री. अनिरुद्ध कुंभार, हिंदु एकता आंदोलन ग्रामीणचे अध्यक्ष श्री. विष्णुपंत पाटील, हिंदु एकता आंदोलन मिरजचे अध्यक्ष श्री. सोमनाथ गोटखिंडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी सर्वश्री प्रमोद धुळुबुळु, श्रीकांत जमदाडे, प्रशांत देसाई, आकाश जाधव, तसेच महिला आघाडीच्या सौ. सुजाता हेगडे यांसह अन्य अनेक गोरक्षक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

संपादकीय भूमिका :

गोवंश हत्याबंदीचा कायदा असूनही गोवंशियांच्या रक्षणासांठी हिंदुत्वनिष्ठांना अजून किती वर्षे लढावे लागणार ?