आता सर्वांना भ्रमणभाषच्या अनुसंधानाची सवय झाल्याने सर्वांचे देवाशी अनुसंधान सुटले आहे ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ |
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार
‘व्यक्तीपेक्षा कुटुंब, कुटुंबापेक्षा गाव, गावापेक्षा राष्ट्र आणि राष्ट्र्रापेक्षा धर्म सर्वश्रेष्ठ आहे; कारण केवळ धर्मच मोक्ष देऊ शकतो, तर इतर सर्व मायेत अडकवतात; म्हणून साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (दैनिक ‘सनातन प्रभात’, २३.१०.२०२३)
२. वरील विचारांचे पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !
२ अ. धर्माचे उद्दिष्ट केवळ ‘मोक्ष मिळवणे’, हे असून त्यासाठी गुरूंच्या सांगण्याप्रमाणे साधना करणे आवश्यक असते ! : ‘जगात अनेक धर्म आहेत; परंतु या सर्व धर्मांचा हेतू ‘मोक्ष मिळवणे’, हा एकच आहे. ‘मोक्ष मिळवणे’, याचा अर्थ ‘आपल्या आत्म्याचे वैश्विक शक्तीमध्ये विसर्जन करणे, आपले अस्तित्व संपवणे’, असा आहे. अस्तित्व संपवणे, म्हणजेच जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होणे. असे असले, तरी आज अनेक धर्मांध लोक आपल्या धर्माचे आचरण सात्त्विकतेने न करता दुसर्या धर्मावर टीका करतात. ते दुसर्या धर्माचा द्वेष करतात. खरेतर ‘धर्माचे उद्दिष्ट केवळ ‘मोक्ष मिळवणे’, हे आहे’, हे कुणीच समजून घेत नाही. मोक्ष मिळवण्यासाठी ‘गुरु सांगतील, त्याप्रमाणे साधना करत रहाणे’, हे फार आवश्यक असते.
२ आ. साधनेचे प्रकार आणि टप्पे
२ आ १. वाचिक साधना : ‘कुणाला न दुखवणे’, ‘दुसर्याला चांगले विचार सांगणे’, ही झाली वाचिक साधना !
२ आ २. लिखाणाशी संबंधित साधना : लिहिण्यातूनसुद्धा आपण चांगली साधना करू शकतो. ‘चांगले विचार लिहिणे, ते लोकांपर्यंत पोचवणे आणि लोकांना ‘आपण का आणि कशासाठी जन्माला आलो आहोत ?’, हे सांगण्याचा प्रयत्न करणे’, ही लिखाणाशी संबंधित साधना म्हणता येईल.
२ आ ३. माणुसकीने वागता येण्यासाठी षड्रिपू आणि अहंकार दूर करणे : माणुसकीचा धर्म जपण्यासाठी साधना करायची असते. ‘माणसा-माणसांमध्ये प्रेम निर्माण करणे, एकमेकांचा द्वेष, असूया न करणे, जमेल तेवढी इतरांची सेवा करणे’, इत्यादी गोष्टी माणुसकीत येतात. हे सर्व होण्यासाठी माणसाने लोभ आणि मोह सोडून देणे आवश्यक असते, तसेच ज्या अहंकारामुळे आपल्या मनात लोभ आणि मोह प्रवेश करतात, तो अहंकार गुरुकृपेने शांत करावा लागतो.
२ आ ४. गुरुकृपेने व्यक्तीचे अहं-निर्मूलन झाल्यावर ती जगाचे कल्याण करणारी महान विभूती बनणे : गुरुकृपेने अहंकाराची शांती झाली की, अनेक गुण व्यक्तीमध्ये प्रविष्ट होतात. मग ती व्यक्ती, व्यक्ती न रहाता संपूर्ण जगाचे कल्याण करणारी विभूती बनते. ही व्यक्ती स्वतःचेच नाही, तर कुटुंबाचेही कल्याण करते. कुटुंबाचे कल्याण झाले की, ते कुटुंब इतरांचे प्रबोधन करते. हळूहळू सर्व समाज आध्यात्मिक वाटेवर मार्गस्थ होतो. यातून सर्व प्राणीमात्रांना शांती, आनंद आणि समाधान यांची प्राप्ती होत जाते.
२ आ ५. आत्मनिवेदन भक्तीने साधकातील सर्व अवगुण गळून पडून तो ‘संत’ होणे आणि त्याला सगळीकडे आनंदच दिसू लागणे : एका भक्तीगीतात म्हटले आहे,
एकतारी संगे एकरूप झालो ।
आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो ।।
गळा माळ शोभे आत्मरूप शांती ।
भक्ती-भाव दोन्ही धरू टाळ हाती ।
टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो ।।
भूक भाकरीची छाया झोपडीची ।
निवार्यास घ्यावी ऊब गोधडीची ।
माया-मोह सारे उगाळून प्यालो ।।
साधक जेव्हा अनन्यभावाने ईश्वरी शक्तीला शरण जातो आणि आत्मनिवेदन भक्ती करतो, तेव्हा त्या साधकातील सर्व अवगुण हळूहळू गळून पडतात आणि त्याला सगळीकडे आनंदच आनंद दिसू लागतो. अशा साधकांनाच समाजात ‘संत’ म्हटले जाते. ‘साधुसंत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।।’, म्हणजे ‘घरी साधू-संत येतील, तीच खरी दिवाळी आणि दसरा !’, असेही म्हटले आहे.
२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेकांना साधनेची वाट दाखवलेली असणे : आपले सद्गुरु प.पू. परब्रह्म श्री जयंत आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) हे अतिशय उच्च कोटीतील संत आहेत. त्यांनी अनेक साधकांना अध्यात्माच्या वाटेवर नेऊन ठेवले आहे. त्यांनी अनेकांचे दुःख दूर केले आहे. त्यांनी अनेकांना ‘आपल्या जीवनाचे मर्म काय असते ?’, हे सांगितले आहे.
२ ई. प.पू. परब्रह्म श्री जयंत आठवले सांगतात, ‘‘चांगला समाज घडवण्यासाठी प्रामाणिकपणे साधना करणे फार महत्त्वाचे असते.’’
२ उ. श्वासागणिक होणार्या जपामुळे साधकाचे शरीर आणि मन स्वच्छ होणे : साधनेमध्ये नामस्मरण आणि नवविधा भक्ती यांचा समावेश होतो. साधना करण्यासाठी सद्गुरु साधकाला गुरुमंत्र देतात. ‘या गुरुमंत्राचा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि ते सांगतील तेवढा जप करत रहाणे’, हे साधकाचे कर्तव्य असते. शेवटी हा जप श्वासागणिक व्हावा लागतो. श्वासागणिक होणार्या जपामुळे आपले शरीर आणि मन स्वच्छ होऊन जाते, तसेच ते माया-मोहापासून दूर दूर जाते.
२ ऊ. द्वैतभाव नष्ट झाल्यावर साधक अद्वैताकडे वाटचाल करू लागणे आणि तो दुसर्याचे दुःख दूर करण्यासाठी झटू लागणे : साधना करणार्या माणसात (साधकात) सद्गुणांचा उद्भव होतो. त्या सद्गुणांमुळे तो इतरांनाही सुख, आनंद आणि समाधान देतो. त्यामुळे त्याच्या भोवती असलेले समाजातील अनेक घटक सद्गुणांनी भारित होतात. साधक त्या प्रचंड वैश्विक शक्तीसमोर नतमस्तक होतो. द्वैतभाव नष्ट होऊन तो अद्वैताकडे वाटचाल करू लागतो, म्हणजेच त्याला दुसर्याच्या आनंदात आपला आनंद दिसू लागतो आणि दुसर्याचे दुःख दूर करण्यासाठी तो झटू लागतो.
२ ए. ‘प्रत्येकाने एकमेकांना साहाय्य केले, तर नक्कीच समाजात शांतता नांदेल आणि धर्माची स्थापना होईल’, असे सद्गुरु प.पू. परब्रह्म जयंत आठवले आपल्या तेजस्वी विचारांतून सांगतात.’
– पू. किरण फाटक (शास्त्रीय गायक), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२७.१०.२०२३)