Indian Navy : युरोपीय देश माल्‍टाची नौका वाचवण्‍यासाठी भारतीय नौदलाची मोहीम !

हिंद महासागरात आतंकवादी आणि दरोडेखोर यांच्‍या विरोधात भारतीय नौदलाचे दोन हात !

नौकेवरील समुद्री दरोडेखोर

नवी देहली – भारतीय नौदल हिंद महासागर आणि अरबी समुद्र येथे पराक्रम गाजवत आहे. भारतीय नौदलाने आता सोमालियाच्‍या समुद्री दरोडेखोरांपासून (चाच्‍यांपासून) माल्‍टा या युरोपीय देशाची ‘एम्‌व्‍ही रौन’ ही नौका वाचवण्‍याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्‍या वेळी चाच्‍यांनी नौदलाच्‍या युद्धनौकेवरही आक्रमण केले. नौदलाने मात्र त्‍यास चोख प्रत्‍युत्तर दिले. दरोडेखोरांनी डिसेंबर २०२३ मध्‍ये एडनच्‍या आखातातून ‘एम्‌व्‍ही रौन’ नौकेचे अपहरण केले होते. त्‍या वेळीही नौदलाने त्‍या नौकेतील एका खलाशाला वाचवले होते.


नौदलाने १५ मार्च या दिवशी सोमालियाच्‍या पूर्व किनार्‍यावर एम्‌व्‍ही रौन ही नौका अडवली. नौदलाने एक निवेदन प्रसारित करून म्‍हटले की, आंतरराष्‍ट्रीय नियमांनुसार समुद्री दरोडेखोरांवर कारवाई केली जात आहे. भारतीय नौदलाच्‍या युद्धनौकेवर चाच्‍यांनी गोळीबार केला. यानंतर नौकेवर उपस्‍थित चाच्‍यांना शरण येण्‍यास सांगण्‍यात आले. तरीही कारवाई चालूच आहे. भारतीय नौदल सागरी सीमांच्‍या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे.

भारतीय नौदलाने दरोडेखोरांपासून बांगलादेशी नौकेचीही केली आहे सुटका !

भारतीय नौदलाने नुकतेच दरोडेखोरांपासून बांगलादेशी नौकेची सुटका केली. १२ मार्च या दिवशी १५ ते २० सशस्‍त्र दरोडेखोरांनी मोझांबिकहून संयुक्‍त अरब अमिरातीकडे जाणार्‍या बांगलादेशी व्‍यापारी नौकेचे अपहरण करण्‍याचा प्रयत्न केला. आक्रमणाच्‍या वेळी नौकेवर बांगलादेशचे २३ खलाशी होते. १४ मार्चच्‍या सकाळी नौदलाने बांगलादेशी नौकेची सुटका केली.