प्रदूषणामुळे पुणे येथील इंद्रायणीकाठी पुन्हा एकदा मृत माशांचा खच !

मृत झालेल्या माशांमध्ये दुर्मिळ देवमाशांचा समावेश !

प्रतिकात्मक चित्र

देहू (जिल्हा पुणे) –  इंद्रायणी नदीचे प्रदूषण ठिकठिकाणी वाढत आहे. आळंदी येथे इंद्रायणी नदी अनेक दिवसांपासून फेसाळत असतांनाच देहू येथे नदी प्रदूषणामुळे नदीतील मासे मृत पावत आहेत. देहूगाव येथे इंद्रायणी नदीच्या काठावर सकाळी कापूरवडा येथे शेकडो मासे मृत पावलेले आढळले. इंद्रायणी नदीत आजवर वाम, मरळ, चिलापी असे मासे आढळत होते; मात्र या नदीत देवमाशांसारखे दुर्मिळ मासेही असल्याचे आजच्या घटनेवरून निदर्शनास आले आहे. मृत झालेल्या माशांमध्ये देवमासेही मरण पावले आहेत.

इंद्रायणी नदीपात्रात ठिकठिकाणी जलपर्णी वाढली आहे. तेथे माशांना पाण्याच्या वरच्या भागात येता येत नाही. त्यामुळे मासे जलपर्णी अल्प असलेल्या कापूरवडा परिसरात आले; मात्र या ओढ्यातून शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात असल्याने पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे. इंद्रायणी नदीच्या पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण अल्प झाले आहे, तसेच नायट्रोजनचे प्रमाण अनेक पटींनी वाढलेले आहे. हा नायट्रोजन जलचरांच्या आरोग्यासाठी धोकादायक असतो. नायट्रोजनमुळे या पाण्यात माशांचा जीव गेला आहे.

‘इंद्रायणी सेवा फाऊंडेशन’चे विठ्ठल शिंदे यांचा वनमंत्र्यांना दूरभाष

देहू (जिल्हा पुणे) – इंद्रायणी नदीत प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडले आहेत. २७ मार्चला देहूमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज असून वारकर्‍यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तरी ‘इंद्रायणी नदी प्रदूषणाविषयी लक्ष घाला’, असा दूरभाष ‘इंद्रायणी सेवा फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. विठ्ठल शिंदे यांनी वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांना केला होता. ‘या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळास लक्ष घालण्यास सांगू’, असे आश्वासन वनमंत्र्यांनी या प्रसंगी दिले.

या संदर्भात श्री. विठ्ठल शिंदे म्हणाले, ‘‘नदीची अवस्था सध्या इतकी बिकट आहे की, ती पहावत नाही. हेच पाणी वारकरी तीर्थ म्हणून प्राशन करतात. त्यामुळे या संदर्भात प्रशासनाने त्वरित लक्ष घालणे आवश्यक आहे.’’

संपादकीय भूमिका :

इंद्रायणी नदी प्रदूषणाविषयी लक्ष घाला ! असे सांगावे का लागते ? प्रशासन स्वत:हून लक्ष कधी घालणार ?