तुर्भे येथील पदपथांवर आंब्याच्या लाकडी पेट्यांचे अतिक्रमण !

तुर्भे विभाग कार्यालय आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या दुर्लक्षाचा परिणाम !

पदपथावर ठेवलेल्या आंब्याच्या लाकडी पेट्या

आग लागल्यास दुर्घटनेची शक्यता !

नवी मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – येथील एपीएम्सी (मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती) फळ मार्केट ते भाजी मार्केट येथपर्यंतच्या पदपथावर आंब्याच्या बांधणीसाठी लागणार्‍या लाकडी पेट्यांची विक्री करणारे बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत. या पेट्या नंतर पदपथांवर ठेवण्यात येतात. ‘अशांवर कारवाई करून पदपथ चालण्यासाठी सर्वांना मोकळे करून द्यावेत’, अशी मागणी पादचार्‍यांनी केली आहे. (पादचार्‍यांना मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कृती का करत नाही ? – संपादक) या ठिकाणी त्यांनी विद्युत् वाहिनीला हात टेकेल इतक्या उंचावर या लाकडी पेट्यांचे थरावर थर रचले आहेत. या पार्श्वभूमीवर एखादी दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.