पनवेल येथील बीपी मरिन ॲकॅडमीतील संतापजनक प्रकार !
पनवेल – येथील बीपी मरिन ॲकॅडमीत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना गेल्या २ मासांपासून निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत आहे. या अन्नात अळ्या, झुरळे सापडत आहेत. पोळ्या आणि भात यांमध्ये खडे लागतात. असे अन्न सेवन केल्याने विद्यार्थ्यांना पोटाचे विकार होत आहेत. काहींना जुलाब होत आहेत; मात्र व्यवस्थापनाच्या दडपणामुळे विद्यार्थी तक्रार करत नाहीत. ‘याविषयी तक्रार केल्यास तुम्हाला अनुत्तीर्ण करू’, अशी धमकी मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. व्यवस्थापनाकडे तक्रार करूनही जेवण आणि पाणी यांच्यात सुधारणा न झाल्यामुळे काही विद्यार्थी तेथे जेवत नाहीत. व्यवस्थापन त्या विद्यार्थ्यांना बाहेरही जेवायला पाठवत नाहीत. (विद्यार्थ्यांवर अरेरावी करणार्या अशा व्यवस्थापनातील संबंधितांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक) ॲकॅडमीत ४०० विद्यार्थी शिकत आहेत. एका विद्यार्थ्याकडून ६ महिन्यांसाठी अडीच लाख रुपयांचे शुल्क आकारले जाते.
योग्य कार्यवाही करण्याचे संचालकांचे आश्वासन !
‘जेवण व्यवस्थापन समितीसमवेत या संदर्भात बैठक घेण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीची नोंद घेऊन यापुढे सुधारणा करण्यात येईल. स्वच्छतेच्या संदर्भात योग्य ती कार्यवाही करू’, असे ॲकॅडमीचे संचालक बादल सिंग यांनी सांगितले.
संपादकीय भूमिका :संचालकांनी आश्वासने देऊन काय उपयोग ? विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच नोंद का घेतली नाही, हे सांगावे ! विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या हानीला उत्तरदायी असणार्या संचालकांवरही कारवाई व्हायला हवी ! |