‘ख्रिस्ती धर्मप्रसार’ हे इंग्रजांनी भारतात रेल्वे चालू करण्यामागील खरे कारण !

‘इंग्रज राज्यकर्त्यांनी भारतियांचे नेहमी हित बघितले, सामाजिक सुधारणा केल्या आणि रेल्वे आणली’, वगैरे वगैरे इंग्रजांविषयी अनेक जण उदो उदो करतांना दिसतात. असे करतांना कुणी दिसले, तर त्यांना आवर्जून सांगा की, ‘द लेटर्स ऑफ क्वीन व्हिक्टोरिया – खंड ३’, या आर्थर बेन्सन आणि व्हायकाऊंट एशर यांनी संपादित केलेल्या अन् वर्ष १९०८ मध्ये छापलेल्या या पुस्तकात महाराणी व्हिक्टोरियाची पत्रे प्रकाशित झालेली आहेत. त्यात पृष्ठ ५३-५४ वर एक पत्र आहे.

श्री. संकेत कुलकर्णी

भारताचा तेव्हाचा गव्हर्नर जनरल डलहौसी याला २४ नोव्हेंबर १८५४ या दिवशी महाराणी व्हिक्टोरियाने एक पत्र लिहिले आहे. त्यात ती लिहिते, “… The progress of the railroad will make an immense difference in India, and tend more than anything else to bring about civilisation, and will in the end facilitate the spread of Christianity, which hitherto has made but very slow progress.’’ (आशय : …रेल्वेमार्गाच्या प्रगतीमुळे भारतात प्रचंड फरक पडेल आणि त्याचा लाभ बाकी कशापेक्षाही तिथे सामाजिक सुधारणा करण्यासाठी होईल. त्याचाही लाभ शेवटी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यास होईल, जो अजूनपर्यंत म्हणावा तसा लाभ झालेला नाही.) ही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. वर्ष १८५४ मध्ये इस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. १८५७ चा उठाव झालेला नव्हता. ‘राणीचा जाहीरनामा’ वगैरे निघालेला नव्हता; पण तरीही राणी चौकशी करत आहे, कसली ? तर ‘रेल्वे’ आणि त्याद्वारे होणार्‍या ‘ख्रिस्ती धर्मप्रसाराची’! याला म्हणतात दूरदृष्टी आणि द्रष्टेपणा ! आपल्याला हवा असलेला एखादा कायमचा पालट घडवून आणायचा असेल, तर त्या दृष्टीने ‘सामाजिक सुधारणा’ या गोंडस मुलाम्याखाली इंग्रज काय काय चाली खेळले, याचे हे एक उत्तम उदाहरण ! आपण या दूरगामी गोष्टी कधी शिकू शकू का ? कि आपल्या पिढ्यान्‌पिढ्या फक्त आपापसांत निरुपयोगी राजकारण करण्यातच खर्ची पडणार ?

– श्री. संकेत कुलकर्णी, लंडन.

(श्री. संकेत कुलकर्णी यांच्या फेसबुकवरून साभार)