‘बेबी शॉवर’ (डोहाळे जेवण) हा येऊ घातलेल्या बाळाच्या जन्माविषयीचा कार्यक्रम ! हा कार्यक्रम सध्या पाश्चात्त्य पद्धतीने नव्या स्वरूपात साजरा करण्याची पद्धत निर्माण होत आहे. यामध्ये ‘बेबी शॉवर केक’ बनवण्याची एक विकृत संकल्पना पाश्चात्त्यांकडून भारतात आलेली आहे. यामध्ये केकवर बाळाची आकृती, तसेच बाळाशी संबंधित विविध चिन्हे, उदा. हातमोजे, स्वेटर, बूट इत्यादी बनवलेले असते. नंतर हा केक आई-वडील कापतात आणि तिथे जमलेले लोक टाळ्या वाजवून हा कार्यक्रम ‘साजरा’ (सेलिब्रेशन) करतात. नंतर जमलेली मित्रमंडळी, नातेवाईक आदींना खाण्यासाठी या केकचे वाटप केले जाते, आई-वडीलही तोच केक खातात. अशा प्रकारे विकृती आणि क्रूरता यांचे (कु)संस्कार समाजात पसरत चालले असून ते आता सर्वमान्य होत आहेत. अशा गोष्टी हिंदूंमध्ये अधिक लोकप्रिय होत आहेत आणि केल्या जात आहेत, ही खेदाची गोष्ट ! ‘जिथे एखाद्या गोष्टीचे ‘रूप’ असते, तिथे त्याची स्पंदने निर्माण होतात’, हे शास्त्र आहे. त्यामुळे ‘बाळ आणि बाळाचे साहित्य असलेली नक्षी केलेला केक कापल्यावर आपणच बाळाच्या गळ्यावर सुरी फिरवल्यासारखे आहे’, ही साधी गोष्टही हिंदूंच्या कशी लक्षात येत नाही ? हा प्रश्न आहे.
ईदच्या दिवशी जेव्हा मुसलमान लोक त्यांच्या लहान मुलांच्या हातात सुरा देऊन बकरीची मान कापायला शिकवतात आणि एक धार्मिक परंपरा म्हणून त्या कृतीचे समर्थन होते. हे पाहून मन विषण्ण होत असते. आजकाल या प्रकारचे केक कापून त्यापेक्षा भयंकर आणि विकृत मनोवृत्ती हिंदूंमध्ये निर्माण होत आहेत, असे वाटते. पाश्चात्त्यांच्या विकृतीमुळेच तेथील अनेक नागरिक ताण आणि निराशा यांच्या आहारी जात आहेत. त्यामुळे आत्महत्या, गुन्हेगारी यांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी आज पाश्चात्त्य नागरिक हिंदु संस्कृतीकडे वळत आहेत. इंग्लंड, जर्मनी, रशिया येथे हिंदु संस्कृतीविषयी मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण झाले आहे. पाश्चात्त्य देशांना जे समजते, ते भारतात राहूनही लोकांना समजत नाही, हे दुर्दैवी आहे !
आई-वडिलांच्या विकृत मनोवृत्तीचा परिणाम गर्भावरही होतो. त्यामुळे गर्भावर असे कुसंस्कार झाले, तर पुढची पिढीही तशीच निपजेल, हे लक्षात घेतले पाहिजे. असे आई-वडील स्वतःच्या पाल्यांवर सुसंस्कार कसे करणार ? चित्रपट कलाकारांची नक्कल करून ‘बेबी शॉवर’साठी अर्धनग्न अवस्थेत छायाचित्रे काढणे (प्रेग्नन्सी फोटोशूट) यांसारख्या कुप्रथांच्या मागे स्त्रिया धावतांना दिसत आहेत. हिंदु संस्कृतीत ‘गर्भसंस्कार’, ‘ओटी भरणे’, असे गर्भावर संस्कार करणारे विधी किंवा डोहाळे जेवण असे कार्यक्रम असतांना अनैतिक गोष्टींचे अनुकरण वाढत जाणे, हे सर्वथा चुकीचे आहे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे.