नेरळ (कर्जत, जिल्हा रायगड) येथील शास्त्रीय गायक श्री. धनंजय जोशी यांच्याविषयी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांना जाणवलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘२ आणि ३ फेब्रुवारी २०२४ या दिवशी नेरळ (तालुका कर्जत, जिल्हा रायगड)) येथील गायक श्री. धनंजय जोशी आणि त्यांचे ४ मित्र यांनी गोवा येथील महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अध्यात्मिक संशोधन केंद्राला भेट दिली. तेव्हा श्री. धनंजय जोशी यांची माझ्या लक्षात आलेली आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. कर्मसापेक्ष भाव

श्री. धनंजय जोशी यांच्यात ‘कर्मसापेक्ष भाव’ (कर्म परिपूर्ण आणि आध्यात्मिक स्तरावर करण्यासाठी आवश्यक भाव) आहे. प्रयोगाच्या ठिकाणी श्रीरामाचे चित्र नव्हते; म्हणून त्यांनी संस्कृत आणि मराठी भाषांतील गीतरामायण गायनाच्या प्रयोगाच्या आरंभी ‘शून्यात पहात श्रीरामाला नमस्कार केला’, असे मला जाणवले. त्यानंतर लगेच ते गायनाशी एकरूप झाले. गीतरामायणाचे गायन करतांना त्यांचा भाव प्रकट झाला नाही; पण त्यांच्या मित्रांनी त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य सांगितल्यावर त्यांचे डोळे भरून आले.

२. अनुभवात्मक गायन

श्री. धनंजय जोशी

श्री. जोशी गात असतांना एकाच ओळीत तारक आणि मारक शक्ती किंवा क्षात्रभाव अन् शरणागतभाव एकानंतर एक जाणवत होता. अन्य गायकांच्या गायनात त्या शक्ती एवढ्या स्पष्टपणे जाणवत नाहीत. ‘गुणधर्मांनी परस्पर विरुद्ध शक्ती गायनातून एका पाठोपाठ एक आणि एकाच ओळीत जाणवणे’, हे पुष्कळच वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते ‘अनुभवात्मक गायन’ (गायनातील विषयाच्या सूक्ष्म स्पंदनांची अनुभूती समजून गायन करणे) करतात’, असे मला जाणवले. या संदर्भात त्यांना विचारल्यावर त्यांनी नम्रतेने सांगितले, ‘‘माझ्या श्री गुरूंनी मला ‘केवळ गायन न करता त्याचा गाभा (अर्थ) त्या गायनात आला पाहिजे’, अशा प्रकारे गायला शिकवले आहे.’’

३. गायन करतांना अंतर्मुख असूनही आवश्यक गोष्टींकडे लक्ष असणे

गायनातून होत असलेल्या साधनेमुळे श्री. जोशी यांच्यात अंतर्मुख वृत्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे गायन करतांना ते अंतर्मुख होऊन स्वर आणि नाद यांच्याशी अनुसंधान साधतात, तर त्याच वेळी ते गाण्याच्या बोलाची प्रतही पहातात, तर मध्येच पखवाजवरील योग्य तालही सांगतात.

४. मनाने स्थिर असणे

श्री. निषाद देशमुख

गायन करतांना किंवा संगीताशी संबंधित अन्य कृती करतांना श्री. जोशी यांचे मन स्थिर जाणवते. त्यांनी एका प्रयोगात पखवाजवादक श्री. छगन निमणे यांना संवादिनी (पेटी) वाजवून साथ दिली. तेव्हाही ते गायन करतांना जेवढे प्रसन्न जाणवत होते, तेवढेच संवादिनीवर वादन करतांनाही प्रसन्न वाटत होते.

५. अन्य वैशिष्ट्ये

अ. त्यांच्यावर भगवान दत्तात्रेय आणि श्री गणपति यांची कृपा आहे.

आ. त्यांचा आवाज मोकळा आहे. पाणी किंवा काही पेय इत्यादी न पीता ते २० मिनिटे सलग गायन करू शकतात.

इ. ते गायनालाच देव मानतात. गायनाच्या माध्यमातून त्यांची साधना होत असल्याने त्यांच्याभोवती सूक्ष्मातून पिवळ्या रंगाची प्रभावळ कार्यरत झालेली दिसते.

ई. श्री. जोशी कर्मयोगी असल्यामुळे त्यांचा परिपूर्ण गायनाकडे कल असतो; पण त्याला ते ज्ञान आणि भाव यांचीही जोड देतात. त्यामुळे त्यांनी सहज म्हटलेले देवतांचे श्लोक ऐकूनही भावजागृती होते.

उ. मी आणि काही साधकांनी श्री. जोशी यांची वैशिष्ट्ये सांगितल्यावर त्यांनी कृतज्ञतेने ‘श्री गुरूंनी माझ्याकडून करून घेतले’, असे सांगितले. यांतून त्यांच्यात ‘श्री गुरूंप्रती अत्यंत कृतज्ञताभाव आहे’, असे माझ्या लक्षात आले.

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा. (३.२.२०२४, दुपारी २.५० ते  ३.२०)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक