(म्हणे) ‘३ कोटी लोकांना भाजपवाले स्वतःच्या घरी ठेवणार आहेत का ?’

‘सीएए’वरून देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भाजपवर टीका !

(सीएए म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायदा (सिटिझनशिप अमेंडमेंट बिल))

देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी देहली – ‘सीएए’मुळे ३ कोटी लोक देशात येतील. त्यांना रोजगार, घर आदी कोण देणार ? भाजपवाले स्वतःच्या घरी त्यांना ठेवणार आहेत का ? अशा शब्दांत देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते येथे पत्रकार परिषद घेऊन सीएए कायद्याच्या विरोधात बोलत होते.

केजरीवाल म्हणाले की,

१. केंद्र सरकार नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करून स्वतःच्या हक्काच्या घरात पाकिस्तानी लोकांना वसवण्याचे काम करत आहे. सरकारी पैसा हा देशाच्या विकासासाठी खर्च व्हायला पाहिजे; मात्र तो पैसा आता पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या ३ देशांमधील लोकांना भारतात स्थायिक करण्यासाठी खर्च केला जाणार आहे. (नागरिकांना सर्वकाही विनामूल्य देण्याच्या योजनेच्या नावाखाली सरकारी पैसा उधळून केजरीवाल सरकार स्वतःचा राजकीय स्वार्थ साधत आहे. त्याविषयी ते का बोलत नाहीत ? – संपादक)

२. या ३ देशांत जवळपास ३ कोटी लोक अल्पसंख्यांक आहेत. आता या अल्पसंख्यांकांसाठी भारताचे दरवाजे उघडतील, तसे या देशांतून मोठ्या प्रमाणात लोक भारतात येतील. ३ कोटींमधून दीड कोटी लोक जरी भारतात आले, तरी त्यांना रोजगार कोण देणार ? या लोकांना कुठे वसवणार ? भाजपचे नेते त्यांना स्वत:च्या घरी ठेवणार आहेत का ? भाजपचे नेते त्यांना रोजगार देणार का ? (केजरीवाल गेली १० वर्षे देहलीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी या काळात किती भारतियांना रोजगार दिला आहे ? हे ते सांगतील का ? – संपादक)

३. देशातील मध्यमवर्ग महागाईने होरपळत आहे. तरुणांना रोजगार मिळत नाही. मग हे प्रश्‍न सोडवण्याऐवजी केंद्र सरकारने ‘सीएए’ आणले आहे. यामुळे केंद्र सरकारचा पैसा पाकिस्तानी लोकांवर खर्च होणार आहे. (‘पाकिस्तानी हिंदूंवर खर्च होणार आहे’, असे केजरीवाल का बोलत नाहीत ? हिंदू शब्द बोलण्याची त्यांना लाज वाटते का ? – संपादक)

४. भाजप हे सर्व मतांचे राजकारण म्हणून करत आहे. भाजप हा एकमेव पक्ष आहे, जो मतासांठी घाणेरडे राजकारण करत आहे. आसामसह ईशान्य भारतातील लोकांचा या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध असून यातून जनतेचा विश्‍वासघात झाला आहे. जनता निवडणुकीत मतदान करून भाजपला प्रत्युत्तर देईल.

संपादकीय भूमिका

  • भारतात कोट्यवधी बांगलादेशी मुसलमान घुसखोर गेली अनेक वर्षे रहात आहेत. राजधानीतही त्यांची संख्या प्रचंड आहे. देशात आता रोहिंग्यांचीही घुसखोरी झाली आहे. त्यांना बाहेर काढण्याविषयी केजरीवाल कधी एक शब्द तरी बोलले आहेत का ? केजरीवाल यांनी या घुसखोरांना स्वतःच्या घरी ठेवले आहे का ?
  • इस्लामी देशांत हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांवर केजरीवाल यांना कधी बोलावेसे का वाटत नाही ? कि त्यांना ते ‘हिंदू’ आहेत म्हणून बोलावेसे वाटत नाही ?
  • केंद्रशासनाने आता बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या मुसलमान यांना हाकलून लावण्याचा कायदा केला पाहिजे. याला केजरीवाल साहजिकच विरोध करणार ! यातून त्यांची दुटप्पी भूमिका जगासमोर आल्याखेरीज रहाणार नाही !