पुणे येथे हिंदुप्रेमी स्नेहमेळावा उत्साहात साजरा !
पुणे, १२ मार्च (वार्ता.) – धर्मशिक्षण, धर्मजागृती, हिंदु राष्ट्राची स्थापना आणि हिंदूसंघटन हे हिंदु जनजागृती समितीचे प्रमुख कार्य आहे. समितीच्या कार्याला यावर्षी २१ वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत हिंदु देवतांचे विडंबन रोखण्यासाठी समितीने यशस्वीरित्या अनेक उपक्रम राबवले. मंदिरांचे सरकारीकरण रोखणे, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रहित करण्यासाठी भाग पाडले. बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंना भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी आंदोलने केली. केंद्र सरकारने याची नोंद घेत एन्.आर्.सी. (राष्ट्रीय नागरिकता नोंदणी) आणि सीएए कायद्यामध्ये समितीच्या शिष्टमंडळाकडून माहिती मागवली. ११ वर्षांपूर्वी ‘लव्ह जिहाद’ आणि ३ वर्षांपूर्वी ‘हलाल जिहाद’ याविषयी जागृती करायला आरंभ केला. त्यामुळे उत्तरप्रदेश आणि अन्य राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदा लागू झाला, तर हलाल जिहादवर बंदी आणली. या कार्यासाठी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गौरव केला. हिंदु राष्ट्र स्थापनेचा गोवर्धन उचलण्यासाठी आपणही आपल्या परीने काठी लावून या कार्यात सहभागी होऊया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांनी केले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ याविषयी मार्गदर्शन केले. स्नेहमेळाव्याला पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी धर्मप्रेमींनी आपले मनोगतही व्यक्त केले. सिद्धार्थ सभागृह, सिंहगड रस्ता येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
धर्मप्रेमींचे मनोगत
१. आपण इतर धर्मांचा अभ्यास करायला हवा, तरच इतर धर्मियांना आपण सडेतोड उत्तरे देऊ शकतो.
२. साधना आणि स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेमुळे हिंदु राष्ट्राचे कार्य करण्याची शक्ती मिळते.