जायका प्रकल्पासाठी केंद्राकडून ४३ कोटींचा निधी उपलब्ध !

पुणे – राष्ट्रीय नदी सुधार प्रकल्पांतर्गत महापालिकेने हाती घेतलेल्या जायका प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी ४३ कोटी १७ लाख रुपयांचा निधी वितरित केला असून राज्य शासनाने तो वर्ग करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. मुळा मुठा नदीमध्ये जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी महापालिकेने राष्ट्रीय नदी सुधार योजनेअंतर्गत जायका प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी ९९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यातील ८५ टक्के रकमेचा निधी केंद्र सरकारकडून दिला जाईल. महापालिकेला केंद्राकडून ८४१ कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे तर उर्वरित १५ टक्के म्हणजे १४८ कोटी रुपयांची रक्कम महापालिका उभारणार आहे. जायका प्रकल्पांतर्गत महापालिका विविध ठिकाणी ११ सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची उभारणी करणार आहे. तसेच काही जुने सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प अद्ययावत करण्यात येतील. या योजनेला २०१६ मध्ये संमती देण्यात आली; मात्र प्रकल्पाचे काम संथगतीने चालू होते. या निधीमुळे आता प्रकल्पाला गती मिळणार आहे.