कोल्हापूर – पेठवडगाव नगर परिषद येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ‘शिवराज्य भवन’ बांधकामासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे. या वास्तूंसाठी आणखी निधी लागणार असून तोही दिला जाईल. पेठवडगावच्या विकासासंबंधीचे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासमवेत आवश्यक निधीही दिला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पेठवडगाव नगर परिषद येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाच्या पहिल्या टप्प्याचे भूमीपूजन, भूमीनंदन वसाहत येथे शिवराज्य भवन बांधण्याच्या पहिल्या टप्प्याचे भूमीपूजन, तसेच अन्य विकासकामांचा शुभारंभ पेठवडगाव येथे ८ मार्चला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते.
या प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांसह अन्य उपस्थित होते.
पेठवडगाव येथील सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकासाठी आवश्यक निधी दिला जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी दिले.