पुणे येथील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील दुःस्थिती !
पुणे – येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये बरे झालेले ३५० हून अधिक रुग्ण आहेत. काही बेघर आहेत, तर काहींना त्यांचे नातेवाईक घेऊन जाण्यास सिद्ध नाहीत. त्यामुळे या रुग्णांना बरे होऊनही रुग्णालयामध्ये रहावे लागत आहे. त्यामुळे मनोरुग्णालयाने रुग्णांना घरी पाठवण्यासाठी किंवा त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी ‘सिंबायोसिस विधी महाविद्यालया’सह सामंजस्य करार केला आहे. बरे झालेल्या मनोरुग्णांना घरी पाठवण्यास हे साहाय्य करणार आहेत, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुनील पाटील यांनी दिली आहे.
उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांना कर्मचारी घरी घेऊन गेल्यास नातेवाईक त्यांचा स्वीकार करत नाहीत. पूर्वीचे घर पालटले आहे, रुग्णाच्या नावे भूमी, सदनिका, शेती आहे; मात्र त्याचा उपयोग रुग्णाला होत नाही. त्यामुळे बरे झालेले रुग्ण रुग्णालयामध्ये राहिल्याने त्याचा ताण रुग्णालयावर पडतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी ‘सिंबायोसिस विधी महाविद्यालया’शी सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाइकांना रुग्णास घेऊन जाण्यासाठी समन्स देणे, रुग्णाला घरी जाण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया राबवणे, रुग्णाला घरी स्वीकारण्यासाठी नातेवाइकांशी चर्चा करणे, तसेच नातेवाइकांमध्ये मानसिक आरोग्य कायद्याविषयी जनजागृती करणे आदी कायदेशीर कामे विनामूल्य होतील.
समाजसेवा अधीक्षक भाऊसाहेब माने म्हणाले की, मनोरुग्णालयातील ११ जणांना घरी पाठवण्यासाठीची कायदेशीर कारवाई चालू केली आहे; मात्र नातेवाईक त्यांना सांभाळण्यासाठी सिद्ध नाहीत; परंतु त्यांची मालमत्ता मात्र त्यांना हवी आहे. अशांना कायदेशीर समन्स पाठवणे किंवा रुग्णाची मालमत्ता संरक्षित करणे ही प्रक्रिया चालू आहे.
अधिवक्ता विभागाचे अधिवक्ता विजय पमनाणी म्हणाले, ‘‘मनोरुग्णालयातील ‘लिगल सेल’ (कायदा विभाग) प्रतिबुधवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत असतो. ‘सिंबायोसिस विधी महाविद्यालया’तील विद्यार्थी रुग्णांची सर्व कौटुंबिक माहिती घेऊन कायदेशीर पूर्तता करणार आहेत. त्यानंतर रुग्णांना घरी पाठवणार किंवा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा होईल.’’
संपादकीय भूमिका :मनोरुग्णांविषयीचे प्रेम अल्प होणे हे घोर कलीयुग असल्याचे द्योतक ! मालमत्तेसाठी मनोरुग्ण नातेवाइकांना घरी घेऊन न जाणार्या नातेवाइकांनाच कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |