ईश्वरपूर, ९ मार्च (वार्ता.) – येथे ८ मार्च या दिवशी ‘शासन आपल्या दारी’ या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ईश्वरपूर दौर्यावर आले होते. या वेळी त्यांनी यल्लामा चौक येथे शिवसेना सांगली जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. त्या वेळी ‘इस्लामपूर’चे ‘उरुण ईश्वरपूर’ हे नामकरण लवकरच होईल’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वासन दिले. या वेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार (बापू), श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, उरुण ईश्वरपूर नामकरण समिती, समस्त हिंदु समाज आदींची अनेक वर्षांपासूनची ‘उरुण ईश्वरपूर’ असे नामकरण करण्याची मागणी आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन !
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध मागण्यांची ३ निवेदने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. यामध्ये ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर नाशिक येथे झालेल्या आक्रमणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे ? हे शोधून काढावे, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे गेल्या मासांत २ अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात जलदगती न्यायालयात सुनावणी घ्यावी, तसेच पुरातत्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या सर्व मंदिरांमध्ये प्रवेशशुल्क रहित करावे आणि तेथे झालेले अतिक्रमण त्वरित काढून घ्यावे’, अशा मागण्यांचा निवेदनात समावेश होता. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण करावे’ या मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी बजरंग दल वाळवा तालुकाप्रमुखश्री. सचिन पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी उपस्थित होते.