राजापूर तालुक्यातील यशवंतगडाची शिवप्रेमींनी केली स्वच्छता !


राजापूर – तालुक्यातील नाटे येथील यशवंतगडाची स्वच्छता शिवप्रेमींनी केली. या गडावर वाढलेली झाडे-झुडपे, तसेच बुरुजाभोवतीची वाढलेली झाडीही काढण्यात आली. त्यामुळे आता गडकोटप्रेमींना हा गड व्यवस्थित पहाता येणार आहे.

छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे महत्त्वपूर्ण अंग असलेले आणि मावळ्यांच्या बलीदानाने पावन झालेले गडकोट म्हणजे स्वराज्याचा अनमोल ठेवा आहे. ‘या गडांचे जतन आणि संवर्धन व्हावे’, या हेतूने ही स्वच्छता करण्यात आली. तिथीनुसार शिवजयंती उत्सवासाठीचे निमीत्त साधून प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी स्थानिक शिवसंघर्ष संघटना, नाटे आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, राजापूर यांच्या वतीने या मोहीमेचे आयोजन केले होते.

या मोहीमेत जैतापूरचा राजा मंडळ; शिवतेज प्रतिष्ठान, कोतापूर; श्रीमंत योगी प्रतिष्ठान, भू पंचक्रोशी यांच्यासह रत्नागिरी येथील राजा शिवछत्रपती परिवार, लांजा येथील शिवगंध प्रतिष्ठानचे शिलेदारही सहभागी झाले होते.

येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी प्रारंभी जवाहर चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन या मोहीमेला प्रारंभ केला. या मोहिमेत लहान मुले, महिला, तरुण आणि वयोवृद्ध अशा सर्व वयोगटांतील सुमारे ८० शिलेदार सहभागी झाले होते.

‘येथील ऐतिहासिक गडकोटांचे संवर्धन आणि जतन होणे महत्त्वाचे आहे. यशवंतगडाची डागडुजी करण्यासाठी स्थानिक आणि अन्य गडकोटप्रेमींचा व्यापक सहभाग वाढवून येथील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आपण कार्यरत रहाणार आहोत’, असे शिवसंघर्ष संघटनेचे मनोज आडविलकर आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे श्री. महेश मयेकर यांनी या वेळी सांगितले.