Bengaluru Cafe Blast : बेंगळुरू (कर्नाटक) येथील बाँबस्फोट प्रकरणातील आतंकवादी पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण चालू !

बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आतंकवादी

पुणे – बेंगळुरू (कर्नाटक) येथील रामेश्‍वरम् कॅफेत १ मार्च या दिवशी झालेल्या बाँबस्फोट प्रकरणातील संशयित आतंकवादी बाँबस्फोटानंतर बेंगळुरूहून बसने पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने अन्वेषण चालू करण्यात आले आहे. बाँबस्फोट घडवल्यानंतर संशयित आतंकवादी बसने कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला. बल्लारी स्थानकातून बस पालटून संबंधित आतंकवादी कर्नाटकातील होस्पेट, गोकर्णपर्यंत गेल्याचा संशय आहे. तेथून तो बसने पुण्याच्या दिशेने आल्याची माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला मिळाली आहे; मात्र संशयित आतंकवादी नक्की पुण्यात पोचला किंवा वाटेत त्याने बस पालटली, याविषयी सांगता येत नाही, अशी माहिती ‘एन्.आय.ए.’च्या अधिकार्‍यांनी दिली.

कर्नाटकातील अन्वेषण यंत्रणांनी याविषयीची माहिती ‘एन्.आय.ए.’च्या पुणे-मुंबईतील पथकांना दिली आहे; मात्र ‘संशयित आतंकवाद्याचा वावर नेमका कोठे आहे ?’, हे निश्‍चित सांगता येत नाही. संशयित आतंकवादी नेमका कसा पसार झाला ? यादृष्टीने अन्वेषण चालू आहे.

बेंगळुरूतील बल्लारी, होस्पेट, भटकळ, गोकर्ण या बसस्थानकांतील सीसीटीव्ही चित्रीकरण मिळवण्यात येत आहे. चित्रीकरणाद्वारे संशयिताची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.