POK Residents Expose PAK : पाकव्याप्त आणि भारतीय काश्मीर यांच्यात पुष्कळ भेद !

पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेने केले भारत सरकारचे कौतुक !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – कलम ३७० रहित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७ मार्च या दिवशी प्रथमच काश्मीर खोर्‍याला भेट दिली. येथे त्यांनी ‘विकसित भारत, विकसित जम्मू आणि काश्मीर’ कार्यक्रमात केंद्रशासित प्रदेशाला ६ सहस्र ४०० कोटी रुपयांहून अधिक रुपयांचे विकास प्रकल्प समर्पित केले. यावरून काही पत्रकारांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये रहाणार्‍या नागरिकांशी संवाद साधला. तेथील लोकांनी त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे सांगितले. तेथील जनता महागाईने त्रस्त असल्याचे त्यांनी कथन केले.

अनेक गावांत ‘वीज म्हणजे काय’, हेच ठाऊक नाही !

एका व्यक्तीने सांगितले, ‘आमच्या अनेक गावांमध्ये ‘वीज म्हणजे काय ?’, हेच ठाऊक नाही. सीमेवरील भारतीय सैन्याच्या चौक्यांवर २४ तास वीज असते; मात्र येथे १२ घंटे वीज नसेल, तर पर्यटक कसे येणार ? पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात वीज बनते आणि ती संपूर्ण पाकिस्तानात जाते. आम्हाला मात्र आमच्या आवश्यकतेपैकी १० मेगावॅट वीजही मिळत नाही.’

पाकव्याप्त काश्मिरात विकास प्रकल्पांवर शून्य टक्केही गुंतवणूक नाही !

ख्वाजा शब्बीर अहमद नावाच्या व्यक्तीने भारतातील काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीर येथील विकासाविषयी बोलतांना सांगितले की, ‘विकासात मोठा भेद आहे. आमच्याकडे कोणत्याही विकास प्रकल्पांवर शून्य टक्केही गुंतवणूक नाही. येथील सर्व प्रेक्षणीय स्थळांसाठी काम झाले पाहिजे. येथील अनेक ठिकाणी (सीसीटीव्ही) कॅमेर्‍यांना बंदी आहे.’

येथील महागाई मर्यादेच्याही पलीकडे !

महागाईविषयी बोलतांना अन्य एक व्यक्ती म्हणाली, ‘येथील महागाई मर्यादेच्याही पलीकडे आहे. काश्मीरमध्ये जे काही उत्पादन होते, ते स्वस्त असते; पण बाहेरून जे काही आयात करावे लागते, त्याची किंमत अत्याधिक असते. भारतातील काश्मिरात महागाईचा दर येथील तुलनेत अल्प आहे. तेथे नोकर्‍याही आहेत. आमचे पाकिस्तानी आपापसांत लढून मरत आहेत.’

पाकिस्तानी सरकार केवळ स्वत:चे पोट भरते !

इयत्ता नववीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याने सांगितले, ‘भारतीय सरकारला त्याच्या लोकांविषयी काहीतरी वाटते. त्यांचे सरकार तेथील लोकांसाठी काम करते. आमचे सरकार केवळ स्वत:चे पोट भरते.’