पुणे येथील संस्कृतप्रधान बालवाडीचा वार्षिकोत्सवाचा कार्यक्रम वेदभवनात उत्साहात साजरा !’

संस्कृत शब्दांवर आधारित अंताक्षरी आणि संस्कृत श्लोकाचे सादरीकरण !

वार्षिकोत्सवात सहभागी बाल विद्यार्थी

पुणे – देववाणी संस्कृतप्रधान बालवाडीचा वार्षिकोत्सव २ मार्च या दिवशी उत्साहात पार पडला. वेदभवन, पुणे आणि ‘देववाणी प्री-प्रायमरी स्कूल’ या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ‘संस्कृत भाषा सर्वांसाठी’, या उद्देशाने वेदभवनाच्या परिसरात ही संस्कृतप्रधान बालवाडी गेल्या ४ वर्षांपासून चालू झाली आहे. शिशुगट, लहानगट, मोठागट अशा पद्धतीने ही शाळा चालू झाली असून या शाळेचा वार्षिकोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. वेदभवनाचे प्रधानाचार्य मोरेश्वर घैसासगुरुजी आणि सौ. ऐश्वर्या घैसास यांनी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या शाळेतील छोट्या मुलांनी स्वत:चे कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने सादर केले. या सादरीकरणात माता शबरीच्या आश्रमात श्रीराम-लक्ष्मण आले आहेत आणि माता शबरी त्यांचे स्वागत करते अन् त्यांना बोरे अर्पण करते, अशी ही कथा असलेले नाट्य सादर करून सर्व बालकलाकारांनी सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आणि वाहवा मिळवली. त्यानंतर संस्कृत शब्दांवर आधारित अंताक्षरी सादर केली आणि एका संस्कृत शब्दावर संस्कृत श्लोक अशा प्रकारे अत्यंत चांगल्या पद्धतीने सुस्पष्ट उच्चार करत सादर केले. असा हा वार्षिकोत्सवाचा कार्यक्रम वेदभवनात पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन ‘देववाणी’च्या संचालिका कु. वेदवाणी घैसास आणि शिक्षिका अंजली कुलकर्णी, प्रेरणा बाग्रोडिया आणि सविता सूर्यवंशी यांनी केले अन् हा कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कांचन गोडबोले यांनी केले.