अमली पदार्थांची समस्या आणि विश्वगुरु भारताचे स्वप्न !

सध्या देशाला अमली पदार्थांच्या (ड्रग्जच्या) पडलेल्या विळ्ख्याविषयी पुष्कळ चर्चा चालू आहे. गेल्या १५ दिवसांत पुणे आणि गुजरात या ठिकाणी सापडलेल्या अमली पदार्थांमुळे ही चर्चा चालू झाली आहे. हा विषय आपल्या देशाच्या भविष्यासाठी अतिशय महत्त्वाचा असला, तरीही असे काही घडल्याविना याविषयी चर्चा घडून येत नाही; मात्र सध्या सापडलेल्या अमली पदार्थांमुळे या समस्येचे भयावह स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे. 

प्रातिनिधिक छायाचित्र

१. अमली पदार्थांचा तरुण पिढीला पडलेला विळखा सोडवणे महत्त्वाचे !

पुण्यामध्ये १ सहस्र ७०० किलो आणि पोरबंदर (गुजरात) या ठिकाणी ३ सहस्र ३०० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले. हे कुठून आले ? कुठे जात होते ? या सगळ्याचा शोध चालू आहे. त्याचा शोध लागेलही; पण या अमली पदार्थांचा पडलेला विळखा कसा सोडवला जाईल ? हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. सरकार आणि अनेक संस्था यांच्याकडून अमली पदार्थांविषयी समाजजागृती केली जाते. शाळा, महाविद्यालये या ठिकाणी कार्यक्रम घेतले जातात; पण त्यामुळे फार मोठा फरक पडतांना दिसत नाही, हे आपल्याला अशा घटनांमधून दिसून येते. यासाठी ठोस असे उपाय जर आपण शोधून काढले नाहीत, तर हा विळखा अधिकाधिक घट्ट होत जाईल आणि आपली स्थिती अमेरिकेप्रमाणे व्हायला वेळ लागणार नाही. एका अहवालानुसार जुलै २०२२ ते जुलै २०२३ यामध्ये अमेरिकेत अमली पदार्थ अधिक प्रमाणात घेतल्याने १ लाख ६ सहस्र लोक मृत्यूमुखी पडले. अमेरिकन सरकार २० बिलियन डॉलर ‘अमली पदार्थ मुक्ती’साठी व्यय करत आहे. अमली पदार्थांचा तरुण पिढीला पडलेला विळखा हा किती भयानक रूप धारण करू शकतो ? हे त्याचे उदाहरण आहे.

कु. अन्नदा मराठे

२. विश्वगुरु होऊ पहाणार्‍या देशाचा समाज नीतीमान नसणे कितपत योग्य ?

आज आपण विश्वगुरु होण्याचे स्वप्न पहात आहोत. ‘जगात ही क्षमता केवळ भारताकडेच आहे’, असे आपण म्हणतो, ते खरे आहेही; पण त्या वाटेत ही सर्वांत मोठी अडचण आहे. १३ मे २०२३ या दिवशी केरळमध्ये २ सहस्र ५०० किलो अमली पदार्थ सापडले. ७ मार्च २०२३ या दिवशी ओखा (जिल्हा कच्छ, गुजरात) येथे

६१ किलो ड्रग घेऊन जातांना ५ खलाशी सापडले. १ डिसेंबर २०२३ या दिवशी ओडिशामध्ये २२० कोटी रुपयांचे अमली पदार्थ एका जहाजात सापडले. ही काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. यापेक्षा किती तरी मोठी आकडेवारी आज इंटरनेटवर उपलब्ध आहे.

‘विश्वगुरु म्हणजे सगळ्या जगाने आदर्श घ्यावा असा देश !’ तेथील प्रत्येक माणूस आणि व्यवस्था उत्तम असेल. जिथे ज्ञान असेल, चारित्र्य आणि नीतीमत्ता असेल. अमली पदार्थांच्या आहारी गेलेला समाज हा कधीही नीतीमान असू शकत नाही. अशी माणसे अमली पदार्थ मिळवण्यासाठी काहीही करायला सिद्ध होतात. ते कोणताही गुन्हा करायला मागे-पुढे पहात नाहीत.

३. अमली पदार्थ मिळण्याच्या ठिकाणांवर कारवाई कधी ?

आज आपल्या देशात तरुण पिढी सर्वाधिक आहे. त्या पिढीला जर नीट दिशा मिळाली नाही, तर ती संपूर्ण पिढी वाया जायला वेळ लागणार नाही. या तरुण पिढीचा उपयोग करून घेऊन आपला देश पुष्कळ पुढे जाऊ शकतो; पण खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी गेल्यामुळे आलेली व्यसनाधीनता हा आज आपल्या तरुण पिढीसमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे असा समाज हा आपल्या विश्वगुरु पदाच्या वाटेतील सर्वांत मोठा अडसर आहे. अनेक शाळा, महाविद्यालये यांच्या आसपास अमली पदार्थांच्या विक्रेत्यांनी स्वतःचे जाळे विणले आहे. मोठमोठे पब्स, बार हे अमली पदार्थ सहजगत्या उपलब्ध होण्याची ठिकाणे बनली आहेत. या सर्वांवर म्हणावी तशी कारवाई होतांनाही दिसत नाही. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याला आज अमली पदार्थाने घेरायला प्रारंभ केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडूनही पुण्यात रात्री १ वाजेपर्यंत पब्स, बार आणि रेस्टॉरंट (उपाहारगृह) चालू ठेवायला नुकतीच अनुमती दिली गेली.

४. व्यसनापासून दूर रहाण्यासाठी वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करणे महत्त्वाचे !

व्यसनापासून दूर रहाणे, हे प्रत्येकाचे वैयक्तिक दायित्व आहे. त्यासाठी आपण स्वतः आधी निश्चय करणे आवश्यक आहे; कारण आपण जर स्वतः ठरवले, तर त्यापासून आपल्याला कुणीच दूर करू शकणार नाही. व्यसनामुळे आपल्या आयुष्याची होणारी हानी आपण समजून घेतली, तर व्यसनापासून दूर रहाणे कठीण नाही. ‘आपली महान परंपरा, सामाजिक मूल्य यांमुळे आपल्याकडे विश्वगुरु होण्याची क्षमता आहे’, असे आपण म्हणतो; मात्र आज या प्रचंड मोठ्या समस्येमुळे ती क्षमता आपण गमावून बसवू कि काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाने आपापल्या परीने या समस्येपासून दूर रहाण्याचा आणि यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करायला हवा; कारण विश्वगुरु होणे, हे केवळ सरकारचे नव्हे, तर प्रत्येकाचे उत्तरदायित्व आहे. (३.३.२०२४)

– कु. अन्नदा विनायक मराठे, दापोली, जिल्हा रत्नागिरी.