कोल्हापूर – वर्ष २०२४-२५ चा नवीन अर्थसंकल्प महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी ५ मार्चला घोषित केला. नागरिकांकडून थेट सूचना मागवून त्याचा अंतर्भाव केलेला, कोणतीही करवाढ नसलेला १ सहस्र २६१ कोटी रुपये जमेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात प्रामुख्याने काळम्मावाडी थेट जलवाहिनीसाठी ४८८ कोटी ७४ लाख रुपयांचे प्रावधान, पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी विशेष निधी, बहुमजली वाहनतळ, कचरा प्रकल्पासाठी ‘बफरझोन’ यांसह अन्य विविध योजनांचा समावेश आहे.
अर्थसंकल्पातील अन्य प्रावधाने
१. घरपट्टी सवलत योजना आणि पाणीपुरवठा योजना यांमुळे दोन विभागांच्या वसुलीत वाढ.
२. शहरातील स्वच्छता प्रभावीपणे करता यावी, यासाठी विविध यंत्र खरेदी करण्यासाठी, तसेच घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि संकलनासाठी ‘पोकलँड’ यंत्र, हायवा डंपर्स, ‘जे.सी.बी.’ आणि ट्रॅक्टर यांच्यासाठी विशेष प्रावधान.
३. शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, शिष्यवृत्ती सराव परीक्षा, कोल्हापूर प्रज्ञा शोध परीक्षा, शालेय क्रीडा स्पर्धा, शिक्षकांकरिता आवश्यक प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात येणार. सध्या १७ ‘सेमी इंग्रजी’ शाळा असून नवीन २ प्राथमिक शाळा चालू करण्याचा मानस.
सध्या महापालिकेच्या ५४ प्राथमिक शाळांमध्ये ‘इ लर्निंग’ची सोय उपलब्ध असून यंदा उर्वरित शाळांनाही त्या पुरवण्याचा मानस.
४. ‘पंतप्रधान ई-बस सेवा’ उपक्रमाच्या अंतर्गत कोल्हापूर महापालिकेला १०० ‘ई-बस’ उपलब्ध होणार आहेत. यामुळे शहरातील प्रदूषण अल्प होऊन पर्यावरणपूरक सेवा देणे शक्य होईल.