रेल्वेतून उतरतांना प्रवाशांनी चादर आणि ब्लँकेट रेल्वे कर्मचार्‍यांकडे देणे बंधनकारक !

नवी देहली – भारतात प्रतिदिन रेल्वेने प्रवास करणार्‍यांची सरासरी संख्या अनुमाने १.८५ कोटी आहे. त्यांपैकी ८.५७ लाख लोक वातानुकूलित डब्यांतून प्रवास करतात. त्यांच्यासाठी रेल्वेकडून चादर आणि ब्लँकेट आणि काही वेळा टॉवेल दिले जातात. रेल्वेतून इच्छित स्थळी उतरतांना संबंधित प्रवाशाने रेल्वेकडून मिळालेल्या गोष्टी रेल्वे कर्मचार्‍यांना देणे बंधनकारक असते, अशी माहिती नुकत्याच एका वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍याने दिली. ही कृती करण्याचे दायित्व प्रवाशाचेच आहे, असा रेल्वेचा नियम सांगतो.

संबंधित अधिकार्‍याने सांगितले की,

१. जर एखादा प्रवासी चादर किंवा ब्लँकेट घेऊन जातांना पकडला गेला, तर रेल्वे त्या प्रवाशाला रेल्वे पोलिसांकडे सोपवते आणि त्याच्या विरोधात आवश्यक कारवाई केली जाते.

२. त्याचप्रमाणे आरक्षित जागेवरून चादर किंवा ब्लँकेट गायब झाल्यास त्याचे दायित्व प्रवाशाचे असून रेल्वे त्याच्यावर कारवाई करू शकते. याचे कारण प्रवाशाने ब्लँकेट आणि चादर मागितलेली असते.

३.चादर आणि ब्लँकेट कुणी नेले, हे निश्‍चित नसल्यामुळे कारवाईही होत नाही, मात्र त्या गोष्टी ‘अटेंडंट’कडे देण्याचे दायित्व प्रवाशाचे आहे, असे मात्र अधिकार्‍याने स्पष्ट केले.