जिल्हाधिकार्‍यांना भगवान श्रीकृष्णाचे संरक्षक घोषित करण्यासाठी न्यायालयात याचिका !

उजवीकडून दुसऱ्यास्थानी अशुतोष पांडेय

मथुरा (उत्तरप्रदेश) – श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टकडून ५ मार्च या दिवशी मथुरा जिल्हा न्यायालयात एक याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली. श्रीकृष्णजन्मभूमीच्या १३.३७ एकर भूमीचे हे प्रकरण असून ‘भगवान श्रीकृष्णाची श्रीकृष्णजन्मभूमीत बालकाच्या रूपात पूजा केली जाते. तो अल्पवयीन असून उत्तरप्रदेश शासनाचे प्रतिनिधी असलेल्या मथुरा जिल्हाधिकार्‍यांना त्यांचे संरक्षक म्हणून नियुक्त करण्यात यावे’, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली आहे, तसेच या संदर्भात मथुरा जिल्हाधिकार्‍यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मार्च या दिवशी होईल.

श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टकडून जिल्हा न्यायालयात केलेली याचिका 

यासंदर्भात ‘श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ मां शाकुम्भरी पीठाचे पीठाधीश्‍वर अशुतोष पांडेय यांनी ‘सनातन प्रभात’ला सांगितले की, शाही ईदगाह मशिदीची वक्फ बोर्डाच्या अंतर्गत करण्यात आलेली नोंदणी बनावट पद्धतीने केली गेली होती. यामध्ये खोटी कागदपत्रे जोडली गेली. याविषयी न्यायालयात आणखी एक प्रकरण चालू असून त्याची सुनावणी ५ मार्च या दिवशी होऊ शकली नाही. पुढील सुनावणी १९ मार्च या दिवशी होईल.