अखंड भारताची चळवळ पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे ! – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते

सदावर्ते यांनी पुणे येथे घेतले नथुराम गोडसेंच्या अस्थीकलशाचे दर्शन !

गुणरत्न सदावर्ते

पुणे – नथुराम गोडसे यांचे विचारपीठ निर्माण झाले पाहिजे. अखंड भारताची चळवळ पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे. उद्धव ठाकरे चुकीच्या विचारांच्या लोकांसमवेत गेले. अशा लोकांविरुद्ध निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे. हिंदुत्वनिष्ठ पक्षाकडून ‘डंके की चोट पे’ (अगदी ठासून सांगणे) निवडणूक लढवणार, असे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. पुणे येथील जंगली महाराज रोडवर ३ मार्चला नथुराम गोडसेंच्या अस्थीकलशाच्या दर्शनासाठी सदावर्ते आले होते. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सदावर्ते पुढे म्हणाले की,

१. पावन अस्थी कलशाच्या दर्शनासाठी आलो होतो. दर्शन घेतल्यांनतर त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. त्यामुळे शक्ती प्रदान झालेली आहे. अखंड भारताची चळवळ पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे. नथुराम गोडसे यांच्या विचारांना ‘कम्युनिस्ट’ थांबवू शकत नाहीत. राजकारणाच्या नावावर आरक्षणाची दुकानदारी चाललेली आहे, ती थांबली पाहिजे.

२. राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण घोषित केले; मात्र हे राज्यघटनेशी सहमत कृत्य नाही. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे मराठा चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या अहवालाला महत्त्व देऊ नये. राज्य सरकारने हा अहवाल स्वीकारला, तर आम्ही त्याला उच्च न्यायालयात आव्हान देऊ.