मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मेट्रो-१२’चे भूमीपूजन !

मुंबई – कल्याणला डोंबिवली आणि तळोजा औद्योगिक वसाहतीमार्गे नवी मुंबई मेट्रोशी जोडणार्‍या ‘मेट्रो-१२’ या उन्नत मार्गिकेचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ३ मार्च या दिवशी झाले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एम्.एम्.आर्.डी.ए.) या मार्गिकेची उभारणी केली जात आहे. आरेखन पालटामुळे या मार्गिकेला विलंब झाला आहे.

कल्याण ते नवी मुंबईतील अमनदूत या २२.१७३ कि.मी. लांबीच्या मार्गावर १९ स्थानके असतील. ही मार्गिका प्रारंभी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते तळोजापर्यंत होती. मात्र तळोजापासून चार कि.मी. अंतरावर नवी मुंबई मेट्रोचे पेनधर हे अखेरचे स्थानक आहे. अमनदूत ते पेनधर मेट्रो स्थानक हे अंतर जेमतेम १०० मीटर असेल.

१. ‘मेट्रो-१२’ ही मार्गिका कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती, मेट्रो स्थानकाजवळ ठाणे-कल्याण ‘मेट्रो-५’शी जोडली जाणार आहे.

२. ‘मेट्रो-५’ ही मार्गिका ठाणे-घाटकोपर-वडाळा या ‘मेट्रो-४’ शी संलग्न आहे.

३. उत्तर ते दक्षिण अशा एकूण १३ मेट्रो मार्गिकांशी ‘मेट्रो-१२३ संलग्न असेल.

कल्याण, बाजार समिती, गणेशनगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली एम्.आय.डी.सी., सागांव, सोनारपाडा, मानपाडा, हेदूटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली (खुर्द), बाले, वाकलान, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि अमनदूत ही ‘मेट्रो-१२’ची स्थानके असून ही मार्गिका ३० डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.