जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्वनिष्ठ यांना गांधीहत्येसाठी उत्तरदायी धरून त्यांना संपवण्याचा घाट घातला ! – शिवराय कुळकर्णी, प्रदेश प्रवक्ता, भाजप

यवतमाळ येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीदिन’ पार पडला !

यवतमाळ, २ मार्च (वार्ता.) – देश स्वतंत्र झाल्यानंतर वर्ष १९४८ मध्ये बहुसंख्य काँग्रेस नेत्यांचा सरदार वल्लभभाई पटेल यांना पाठिंबा होता; परंतु गांधीहत्येनंतर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा आधार घेत जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःला गांधींचा राजकीय वारस म्हणून प्रस्थापित केले. वर्ष १९५२ मध्ये काँग्रेस प्रचंड बहुमताने निवडून आली आणि नेहरू घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले. नेहरूंनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्वनिष्ठ यांना गांधी हत्येसाठी उत्तरदायी धरून त्यांना संपवण्याचा घाट घातला होता, असे रोखठोक प्रतिपादन प्रख्यात वक्ते तथा भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी केले. ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पणदिनी लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात आयोजित अभिवादन सोहळ्यात बोलत होते. सावरकर विचार मंच, समर्पण बहुउद्देशीय संस्था आणि राष्ट्रनिर्माता सांस्कृतिक मंच यांच्या वतीने ‘सावरकर विचार दर्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण जीवनच देशासाठी समर्पित होते. लेखक, कवी, नाटककार, हिंदू संघटक, विज्ञाननिष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशी विविध रूपे असणारे सावरकर नव्या पिढीने वाचले अन् समजून घेतले पाहिजेत’, असे विचार या वेळी प्रमुख अतिथी डॉ. शीतल वातीले यांनी मांडले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक श्री. विलास देशमुख, स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंचाचे अध्यक्ष डॉ. सतपाल सोवळे, यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंदडा, हिंदू महासभेचे श्री. लक्ष्मणलालजी खत्री, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्री. राजू पडगीलवार, शहर अध्यक्ष श्री. शंतनू शेटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय फोकमारे यांच्यासह शेकडो सावरकरप्रेमी उपस्थित होते.