‘जय श्रीराम’ म्हणा !

रामलल्लाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी स्वर्गीय आनंद काय असतो, याचा अनुभव देशवासियांनी घेतला. सारा देश त्या वेळी राममय झाला होता. ‘जय श्रीराम’च्या घोषणेने सारा आसमंत दुमदुमला होता. श्रीरामसोहळ्याच्या या आनंदातून आजही अनेक जण बाहेर आलेले नाहीत. एकमेकांना भेटतांना, भ्रमणभाषवर बोलतांना एकमेकांना ‘हाय-हॅलो’ करणारी मंडळी २२ जानेवारीपासून ‘जय श्रीराम’ म्हणू लागली आहेत; मात्र हेच ‘जय श्रीराम’ म्हणणे इयत्ता चौथीच्या १० वर्षीय मुलांना त्रासदायक ठरले. शाळेत ‘जय श्रीराम’ म्हटल्याने प्रथम वर्गशिक्षकाने आणि नंतर मुख्याध्यापकाने १० वर्षीय मुलांचा शारीरिक छळ केल्याची घटना उघडकीस आली. आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील बालीपाराजवळील खेलमती येथील एका मिशनरी शाळेमध्ये हा प्रकार घडला. १० वर्षांच्या विद्यार्थ्यांनी वर्गात ‘जय श्रीराम’ म्हटल्याने त्यांचा छळ करण्यात आला. या प्रकरणी ‘कुटुंब सुरक्षा परिषद’ या हिंदु संघटनेने संबंधित शाळा व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली. ज्या विद्यार्थ्यांचा छळ करण्यात आला, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली आणि शाळा प्रशासनाकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.

पालक आर्थिक परिस्थिती नसतांनाही भरमसाठ शुल्क भरून कॉन्व्हेंट मिशनरी शाळांमध्ये पाल्यांना घालतात. या शाळांमध्ये बहुतांश मुले हिंदु असली, तरी येथील व्यवस्थापनाला हिंदूंच्या धार्मिक प्रथा, परंपरा, हिंदूंच्या देवता, सण-उत्सव यांचे प्रचंड वावडे असते. मुलांनी कपाळाला टिळा लावणे, हातात कडे घालणे, तुळशीमाळ घालणे, हे या शाळांमध्ये चालत नाही. मुलींनी कपाळाला कुंकू वा टिकली लावणे, हातात बांगड्या घालणे, हातावर मेंदी काढणे, कानात कुडी घालणे या गोष्टीही अनेक शाळांना वर्ज्य आहेत. उलट ख्रिसमसच्या काळात मुलांना लाल कपडे आणि लाल टोप्या घालून येण्याची सक्ती केली जात. हिंदूंच्या सण-उत्सवांना मुद्दामहून परीक्षा ठेवल्या जातात. मुलींना गुडघ्याच्या वर स्कर्ट घालण्याची सक्ती केली जाते. या सर्व गोष्टींसाठी पालक आणि विद्यार्थी यांना सक्त ताकीद दिली जाते. एकमेकांना भेटल्यावर किंवा भ्रमणभाषवर म्हटल्या जाणार्‍या ‘हाय’ किंवा ‘हॅलो’ या पाश्चात्त्य पद्धतीमुळे नकारात्मक लहरींचे प्रक्षेपण होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. उलट एकमेकांना भेटल्यावर किंवा जातांना ‘राम राम’ असे म्हणण्याची पद्धत पूर्वीपासूनच भारतात अनेक ठिकाणी आहे. काही जण भेटल्यावर किंवा भ्रमणभाषवर ‘हरि ॐ’ किंवा ‘नमस्कार’ म्हणतात. भारतीय पद्धतीचे अनुकरण आता विश्वभर होत आहे. नुकतेच चमच्यापेक्षा हाताने जेवण्याचे लाभ लक्षात आल्याचे संशोधन विदेशात पुढे आले आहे. त्यामुळे ख्रिस्ती शाळांच्या प्रत्येक बळजोरीच्या विरोधात हिंदूंनी आवाज उठवून ‘जय श्रीराम’चाच गजर करणे आता आवश्यक आहे !

– श्री. जगन घाणेकर, मुंबई.