हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला समाजातील विविध धर्माभिमान्यांकडून मिळालेले साहाय्य !

१. ‘आधुनिक वैद्य आणि उद्योजक यांना ‘हिंदु राष्ट्र’ हा विषय समजावा’, यासाठी साहाय्य करणारे बीड येथील हितचिंतक ह.भ.प. सुधाकर नकाते महाराज !

‘बीड येथील संघटन मेळाव्यामध्ये एक हितचिंतक ह.भ.प. सुधाकर नकाते महाराज उपस्थित होते. हिंदु संघटन मेळावा झाल्यानंतर त्यांनी मला स्वतःहून भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘मेळाव्यात तुमचा विषय छान झाला. असा विषय सर्वांपर्यंत पोचला पाहिजे. तुम्ही आमच्या घरी येऊन आमच्या मित्र परिवारांनाही सांगा.’’ त्यानंतर त्यांनी बीड शहरातील ६ – ७ आधुनिक वैद्य आणि उद्योजक यांना त्यांच्या घरी बोलावले. त्या ठिकाणी विषय मांडण्यापूर्वी माजी सैनिक श्री. सीताराम उबाले यांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ अशा घोषणा देऊन स्वागत केले. त्या वेळी त्या सर्वांना ‘हिंदु जनजागृती समितीचा परिचय’ आणि ‘हिंदु राष्ट्र’, हा विषय सांगितला. तेव्हा गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द प्रत्येक सामान्य व्यक्तीपर्यंत पोचत आहे. समाज पुढाकार घेऊन हिंदु राष्ट्राचा विषय ऐकण्यासाठी सिद्ध होत आहे’, असे मला वाटले. तेव्हा माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होऊन भावजागृती झाली.

श्री. विनोद महादेव रसाळ

२. हिंदु राष्ट्र आंदोलनाची अनुमती मिळण्याची अडचण सुटल्यावर ‘ईश्वरच ईश्वरी कार्य करून घेत आहे’, असे वाटणे

मी बीड येथे हिंदु राष्ट्र आंदोलनाची अनुमती काढण्यासाठी पोलीस ठाण्यात २ वेळा गेलो; परंतु तेथे संबंधित पोलीस उपस्थित नसल्याने योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. तेव्हा तेथील एक पोलीस कर्मचारी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, ‘‘मी कालच्या हिंदु संघटन मेळाव्यासाठी आलो होतो. मी तुम्हाला साहाय्य करण्यास सिद्ध आहे.’’ त्यांनी संबंधित पोलीस कर्मचार्‍यांना बोलावून अनुमतीचे पत्र सिद्ध केले आणि ते मला त्वरित दिले. यावरून ‘कालमहात्म्यानुसार ईश्वरच ईश्वरी कार्य करून घेत आहे. मला माझी साधना म्हणून गुरूंच्या समष्टी रूपाची सेवा करायची आहे’, असे मला वाटले. तेव्हा माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होऊन भावजागृती झाली.

समाजातील व्यापार्‍यांनी नामजप ऐकणे

‘मी समाजातील व्यापार्‍यांना संपर्क केल्यानंतर त्यांना नामजप करायला सांगितला. काही व्यापारी त्यांच्या दुकानात आणि घरांमध्ये नेहमी भ्रमणभाषवर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लावून स्वतः ऐकतात आणि कुटुंबालाही ऐकण्यासाठी सांगतात.’

– श्री. विनोद महादेव रसाळ, सोलापूर (२०.७.२०२३)

३. हिंदूसंघटन मेळाव्यासाठी साहाय्य करणारे मिठाईचे दुकानदार श्री. संतोष यादव !

मी बीड येथे हिंदूसंघटन मेळाव्यासाठी संपर्काला गेल्यावर एका मिठाईचे दुकानदार श्री. संतोष यादव यांना संघटन मेळाव्याविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी दहा साधकांची महाप्रसादाची व्यवस्था केली.

४. शहरातील प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या व्यवस्थापकांची भेट घडवून आणणारे प्राचार्य डॉ. अजित चौधरी !

बीड येथील यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित चौधरी वर्ष २०२३ मध्ये वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये सहभागी झाले होते. अधिवेशनावरून बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी आमची शहरातील प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या व्यवस्थापकांची भेट घडवून दिली. आम्ही त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती सांगितली, तसेच त्यांना राष्ट्र आणि धर्म कार्याची माहिती सांगितली. तेव्हा व्यवस्थापक आम्हाला म्हणाले, ‘‘तुमचे रहायचे आणि जेवणाचे कसे करता ?’’ त्यावर डॉ. चौधरी त्यांना म्हणाले, ‘‘यांच्या पाठीशी भगवान श्रीकृष्ण आहे. तोच यांचा योगक्षेम वहातो.’’

– श्री. विनोद महादेव रसाळ, सोलापूर (२०.७.२०२३)